
सिलिंडरच्या स्फोटात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
चाकण ता. २१: चाकण-तळेगाव मार्गावरील चाकण येथील राणूबाई मळ्यात (ता. खेड) आज (ता. २१) रात्री साडेआठच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरच्या टाकीचा स्फोट झाला. स्फोटामुळे सुरेश परशुराम बिरदवडे यांच्या बंगल्याचा स्लॅब व भिंतीचा मलबा शेजारील घरावर कोसळल्याने चंदाबाई पांडुरंग बिरदवडे (वय ८५) यांचा मृत्यू झाला आहे.
या स्फोटात बिरदवडे यांची पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ आदी पाच जण भाजले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुलगा अक्षय गंभीररीत्या भाजून जखमी झाला आहे.
चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडरच्या स्फोटामुळे संगीता ऊर्फ गीतांजली सुरेश बिरदवडे, अक्षय सुरेश बिरदवडे, वैष्णवी सुरेश बिरदवडे, तुकाराम ऊर्फ लालू परशुराम बिरदवडे, लक्ष्मीबाई परशुराम बिरदवडे हे भाजले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात घराची पडझड झालेली आहे. घराच्या भिंती तुटून शेजारी राहणाऱ्या अंजाबाई प्रभाकर केळकर यांच्या घरावर पडल्याने त्याही जखमी झाल्या. दरम्यान, धीरज केळकर यांच्या घरावरही भिंत व मलबा पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, जेसीबी मशिनच्या सहाय्याने मलबा बाजूला हटवण्यात आला.
04713