चाकण औद्योगिक वसाहतीत बिबट्याचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण औद्योगिक वसाहतीत बिबट्याचा वावर
चाकण औद्योगिक वसाहतीत बिबट्याचा वावर

चाकण औद्योगिक वसाहतीत बिबट्याचा वावर

sakal_logo
By

चाकण, ता.३१ : चाकण शहर तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्याच्या वावरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील वर्षापासून बिबट्याचा येथे वावर वाढत आहे. त्यामुळे बिबट्यासाठी चाकण परिसर बिबट्या प्रवणक्षेत्र झाला आहे. बिबट्या अगदी चाकण शहराकडे आणि औद्योगिक वसाहतीकडे येतो आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
चाकण (ता. खेड) परिसरात मागील आठवडाभरात तीन बिबटे वनविभागाने जेरबंद केल्याने चाकण परिसर हा बिबट्या प्रवण क्षेत्र झाला आहे. चाकण परिसरातील पूर्वपट्ट्यात, पश्चिम पट्ट्यात तसेच उत्तर पट्ट्यात नदीकिनारी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खेड तालुक्याला आंबेगाव व शिरूरच्या सीमा लागून असल्याने या भागातील बिबटे या परिसरात येत आहेत. चाकण परिसरातील वनविभागाच्या हद्दीतही बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. वनविभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याने गेल्या पाच वर्षांपूर्वी कडाचीवाडी गावच्या हद्दीत चाकण- शिक्रापूर मार्गावर वाहनाची धडक झाल्याने एका बिबट्याचा मृत्यू झाला.
शेलपिंपळगाव, मोहितेवाडी, दौंडकरवाडी बहूळ, कोयाळी या परिसरातील बिबट्याचे सातत्याने वास्तव्य आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी कोयाळी येथे गावाजवळच एका बाभळीच्या झाडावर बिबट्या चढलेला होता तो बिबट्या जाळीत पकडत असताना निघून गेला होता.

चाकण परिसरातील शेजारील ग्रामपंचायती कचरा हा मोठ्या प्रमाणात उघड्यावर टाकतात. त्या कचऱ्यातील काही पदार्थ खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात श्वान तेथे येतात.त्यामुळे बिबट्याचे भक्ष या परिसरात वाढते आहे. भक्षाच्या शोधामध्ये बिबट्या या परिसरात येत असल्याचे जाणवते आहे.
- योगेश महाजन, वनपरीक्षेत्र अधिकारी, चाकण