कडाचीवाडी परिसरातील प्लॉटिंग विक्रेत्यास नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडाचीवाडी परिसरातील
प्लॉटिंग विक्रेत्यास नोटीस
कडाचीवाडी परिसरातील प्लॉटिंग विक्रेत्यास नोटीस

कडाचीवाडी परिसरातील प्लॉटिंग विक्रेत्यास नोटीस

sakal_logo
By

चाकण, ता. १ : कडाचीवाडी (ता. खेड) येथे चाकण-शिक्रापूर मार्गावर ‘यश पार्क’ नावाने प्लॉटिंग केले असून, विक्री सुरू आहे. मात्र, हे प्लॉटिंग बेकायदा असून, त्याला कोणतीही कायदेशीर परवानगी नाही, असा आरोप करत कडाचीवाडी ग्रामपंचायतीने संबंधितांना नोटीस दिली आहे, अशी माहिती सरपंच महादेव बचुटे व ग्रामविकास अधिकारी नीलिमा जाधव यांनी दिली.
या प्लॉटिंगला ग्रामपंचायत व कोणाचीच परवानगी नाही, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. या प्लॉटिंगमध्ये प्लॉटधारकांनी घरे बांधल्यास तेथील सांडपाणी कोठे सोडायचे हा प्रश्न आहे. पिण्याचा पाणीपुरवठा कोठून मिळवायचा, हा प्रश्न आहे. याबाबत सरपंच बचुटे व ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी सांगितले की, शासनाची कोणतीही परवानगी न घेता चालू असलेल्या प्लॉटींगमुळे ग्रामपंचायतस्तरावर लोकांच्या मूलभूत सुविधा देताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्ते, ड्रेनेज, पाणी सुविधा देताना व कचरा व्यवस्थापन करताना खूप अडचण येते. व्यवस्थित नियोजन करून बांधकामे केल्यास आणि प्लॉटींग करणाऱ्या व्यक्तींनी कचरा व्यवस्थापनासाठी जागा सोडल्यास भविष्यात येणाऱ्या तक्रारींचे निवारण करणे सोपे होईल. बेकायदा प्लॉट विक्री करणाऱ्या प्लॉटिंग केलेल्यांना ग्रामपंचायतीने नोटीस दिली आहे.’’

‘सुविधा देण्याचे नियोजन’
याबाबत संबंधित प्लॉटिंग जमिनीचे मालक विजय मेदनकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीने दिलेली नोटीस मिळालेली आहे. आम्ही सांडपाण्याचे व इतर सोयी सुविधांचे नियोजन करणार आहोत.