‘येळकोट, येळकोट’च्या गजराने दुमदुमला परिसर

‘येळकोट, येळकोट’च्या गजराने दुमदुमला परिसर

चाकण, ता. ६ : मेदनकरवाडी (ता. खेड) येथील माघी पौर्णिमेनिमित्ताने खंडोबा महाराजांच्या यात्रेनिमित्ताने बारा गाड्यांचा पारंपारिक कार्यक्रम झाला. यावेळी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी तसेच बारा गाड्यांचा पारंपारिक कार्यक्रम पाहण्यासाठी सुमारे एक लाखावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ‘येळकोट, येळकोट, जय मल्हार’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. भंडार- खोबऱ्याच्या उधळणीने परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला होता.

पहाटे पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. हारतुरे, नैवेद्य, देवाची गाणी, आरती आदी कार्यक्रम झाले. भंडार-खोबऱ्याची तळी भरण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बैलगाड्या, बैलांचे बगाड, वाजंत्री, डीजे वाद्याच्या गजरात मिरवणुका पार पडल्या. मिरवणुकांत भंडार-खोबऱ्याची उधळण करीत असताना डीजे वाद्यांच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता.

पारंपारिक नवसाचे बगाड पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. चऱ्होली खुर्द येथील थोरवे कुटुंबाचे पारंपारिक बगाड दरवर्षी येते. या बगाडावर दोन लहान मुले दोन्ही बाजूला बसविली जातात व विधीवत नवस फेडले जातात.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पारंपारिक मानाचे बारा गाडे देवाचे भक्त करंगळी लावून ओढतात. या आख्यायिकेप्रमाणे देवाच्या भक्तांनी सुमारे अर्धा किलोमीटर बारा गाडे ओढले. बारा गाड्यांपुढे दिवट्या हातात घेतलेले भाविक होते. देवाचे मानाचे बारा गाडे सुमारे अर्धा किलोमीटर ओढण्यात आले. हा धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यात्रेचे आयोजन मेदनकरवाडी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, खंडोबा महाराज देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले होते.
------------------------

----------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com