चाकण परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी
चाकण परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी

चाकण परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी

sakal_logo
By

चाकण, ता. २० : चाकण (ता. खेड) व परिसरातील गावात शिवजयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक, पालखी, ढोल, ताशा वाद्यांच्या गजर, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा निनाद तसेच भगवे ध्वज फडकावत, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सादर करण्यात आले. यामध्ये तरुण, तरुणींसह विद्यार्थी, पुरुष, महिलांचा मोठा सहभाग होता.
चाकण (ता. खेड) येथे शिवजयंती उत्सवानिमित्ताने पी. के फाउंडेशनच्या शैक्षणिक संकुलामध्ये शिवकालीन नाणी, मोडीलिपीतील लेख व शिवकालीन युद्धकला साहित्य प्रदर्शन आयोजित केले होते. परिसरातील युवक तसेच ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. शिवजयंतीच्यानिमित्त विद्यार्थ्यांनी चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक व शिवज्योत शैक्षणिक संकुलामध्ये आणली होती. यावेळी पी. के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड, सचिव नंदा खांडेभराड यांच्या हस्ते शैक्षणिक संकुलातील शिवस्मारकाचे पूजन करण्यात आले. तसेच शिवप्रतिमेची पालखीद्वारे मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी विविध शैक्षणिक शाखांमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड यांनी आपल्या मनोगतात आजच्या काळातील विद्यार्थी व युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवावा व त्याप्रमाणे आपले वर्तन ठेवून समाजामध्ये आदर्श निर्माण करावा असे विचार व्यक्त केले.
यावेळी संस्थेच्या संचालक अक्षता खांडेभराड, निकिता खांडेभराड, एस.ए.पाटील, दीपक साळुंखे, चैताली येहेकर आदी शिक्षकवर्ग, पालक आदी उपस्थित होते.