
भांबोलीतील अपघातप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
चाकण, ता. १ : भांबोली (ता. खेड) येथील अपघातात ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालक तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सोपान सीताराम पिंजण (वय ७०, रा. भांबोली) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा सोमनाथ पिंजण (वय ३९)याने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर दुचाकी चालक आरोपी शुभम शिवाजी भोर (वय ३०, रा. भोरवाडी, वडगाव कांदळी, ता. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सात फेब्रुवारीला रात्री सव्वासातच्या सुमारास वासुली फाटा येथे झाला होता. शुभम हा चाकण बाजूकडून वासुलीकडे त्याच्या दुचाकीवरून चालला होता. त्याने दुचाकी भरधाव चालवून सोपान पिंजण या पादचाऱ्याला जोराची धडक दिली होती. पिंजण हे अपघातात गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचा ११ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.