चाकण परिसरात बिबट्याचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण परिसरात बिबट्याचा वावर
चाकण परिसरात बिबट्याचा वावर

चाकण परिसरात बिबट्याचा वावर

sakal_logo
By

चाकण, ता. ५ : चाकण परिसरामध्ये नागरी वस्तीत व औद्योगिक वसाहतीत बिबट्या दिसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. चाकण औद्योगिक वसाहत परिसर तसेच रहिवासी वस्ती मोठी आहे. या परिसरात बिबटे गेल्या वर्षभरापासून ठाण मांडून आहेत.
चाकण (ता. खेड) परिसरात पाच वर्षांपूर्वी बिबट्याचा थांगपत्ता नसताना मागील वर्षापासून बिबट्याचा येथे वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबट्या अगदी चाकण शहराकडे आणि औद्योगिक वसाहतीकडे येत आहे. बिबट्या काही लोकांना दिसत असल्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने ही नागरिकांना, कामगारांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
चाकण, शेलपिंपळगाव, मोहितेवाडी, दौंडकरवाडी, बहुळ कोयाळी, काळुस, वाकी परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढते आहे. ऊसतोड झाल्यानंतर बिबटे चाकण शहरालगत नागरी वस्त्यांमध्ये, औद्योगिक वसाहतीत येतात.
याबाबत चाकण वनपरीक्षेत्राचे अधिकारी योगेश महाजन म्हणाले, ‘‘चाकण परिसरातील ग्रामपंचायती कचरा मोठ्या प्रमाणात उघड्यावर टाकतात. त्या कचऱ्यातील काही पदार्थ खाण्यासाठी, तसेच पोल्ट्री मधील मेलेल्या कोंबड्या खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात श्वान तेथे येतात. त्यामुळे बिबट्याचे भक्ष या परिसरात वाढत आहे. त्या भक्षाच्या शोधामध्ये बिबट्या या परिसरात येत असल्याचे जाणवते आहे. बिबट्याने अनेक श्वानांचा फडशा केलेला आहे. चाकण नगरपरिषद व शेजारील ग्रामपंचायत यांच्याकडून जो कचरा उघड्यावर टाकला जातो तो बंदिस्त करावा व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. याबाबत त्यांना पत्र देण्यात येणार आहे. बिबट्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. बिबट्या दिसल्यास वन विभागाच्या कार्यालयाला तत्काळ माहिती द्यावी.’’ काही लोक इतर ठिकाणचे बिबट्याचे व्हिडिओ चाकण परिसरात बिबट्या दिसला असे मेसेज टाकून शेअर करतात. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते. अशा खोट्या व्हिडिओवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. जे लोक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतात त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असेही वनपरिक्षेत्र अधिकारी महाजन यांनी सांगितले.