
चालकाला मारहाणप्रकरणी चाकणमध्ये चौघांवर गुन्हा
चाकण, ता. ११ : चाकण-तळेगाव मार्गावर चाकण येथे आयफेल सिटीसमोर आरोपींनी एका वाहनावर दगडफेक करून वाहनाची काच फोडून नुकसान केले. तसेच, चालकाला मारहाण केली. त्याच्या पायावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले.
याप्रकरणी अजय अप्पासाहेब जाधव (वय १८, रा. आयफेल सिटी, चाकण, ता. खेड) याने पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आरोपी प्रवीण अशोक प्रधान (वय १८, रा. महात्मा फुले नगर, चाकण), मुक्तेश्वर संतोष दिंडे (वय २१, रा. दावडमळा, चाकण), विकी बबन येलसटे (वय १९), करण इंगळे (दोघेही रा. चाकण) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक केलेली आहे, अशी माहिती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार बुधवारी (ता. ८) रात्री दहाच्या सुमारास घडला. फिर्यादी जाधव हे आपले वाहन घेऊन जात असताना आरोपींनी गाडीवर दगड फेकून गाडीची काच फोडून नुकसान केले. तसेच, त्यांना हाताने मारहाण केली. आरोपी येलसटे याने फिर्यादीच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादी व त्याच्या सोबत असलेला सहकारी तेथून पळून जात असताना आरोपींनी पाठीमागून दगडफेक केली. आरोपी दुचाकीवरून पळून गेले.