
Bullock Cart Competition : चऱ्होलीत येत्या सोमवारपासून 'महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यती'
चाकण - चऱ्होली (ता. खेड) येथे येत्या सोमवार (ता. २७) ते शुक्रवार (ता. ३१), असे पाच दिवस 'महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यती'चे आयोजन केले आहे. खेड पंचायत समिती व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने या बैलगाडा शर्यती आयोजित केल्या आहेत. या शर्यतीत सहभागी होणाऱ्या बैलगाड्यांसाठी येत्या गुरुवारी (ता. २३) सोळू (ता. खेड) येथे सकाळी आठ वाजल्यापासून बैलगाडा टोकन काढण्यात येणार आहेत. त्यासाठी बैलगाडा मालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी सभापती रामदास ठाकूर युवा मंचने केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बैलगाड्यांसाठी लाखो रुपयांची बक्षीसे जाहीर केली आहेत. यात फायनलमध्ये प्रथम येणाऱ्या बैलगाड्यासाठी एक महिंद्रा थार, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी एक ट्रॅक्टर, चौथ्या क्रमांकासाठी बुलेट; तसेच वीस दुचाकी ठेवलेल्या आहेत. याशिवाय प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चौथ्या क्रमांकासाठी दोन लाख, एक लाख ५१ हजार, एक लाख आणि ५१ हजार रुपयांची रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे नियोजन व बक्षिसांची भव्यता विचारात घेता राज्यातील नामांकित बैलगाडे या शर्यतीत सहभागी होणार आहेत. या बैलगाडा शर्यती आमदार दिलीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, या शर्यतीच्या घाटात सोमवारी (ता. २७) माजी मंत्री धनंजय मुंडे, मंगळवारी (ता. २८) विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, बुधवारी (ता. २९) माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गुरुवारी (ता. ३०) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शुक्रवारी (ता. ३१) विरोधी पक्ष नेते अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रामदास ठाकूर यांनी दिली.