
लावणीला कोणी बदनाम करू नये ः खेडकर
चाकण, ता. २६ : सध्या राज्यात कोणी अश्लील चाळे करून लावणीला बदनाम करत आहे. ढोलकीच्या लावणीला डिजेचे स्वरूप दिले जात आहे. ते फार चुकीचे आहे. काही तरुणी प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी अश्लील चाळे करतात. त्याचे रिल्स करतात आणि प्रसिद्ध होण्याचा चुकीचा प्रयत्न करतात. हे कलाकार म्हणून योग्य नाही, असे मत तमाशा फडमालक रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केले.
कोरोनानंतर राज्यात यावर्षी तमाशा फडाला मोठी मागणी आहे. तमाशा फडांचे खेळ हाउसफुल झालेले आहेत. मोठ्या तमाशा फडांच्या सुपाऱ्या अगदी पावणे चार लाखापर्यंत गेलेल्या आहेत. छोट्या, मोठ्या तमाशांना चांगले दिवस आहेत. काही तरुणी चुकीच्या पद्धतीने लावणी सादर करून अश्लील चाळे करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत असेल तर ते फार चुकीचे आहे. त्यांना काही प्रेषक थोड्या पुरता प्रतिसाद देतात. परंतु, जास्त काळ हे टिकत नाही. तमाशा कलाकार कला सादर करताना योग्य पद्धतीने कला सादर करतात. शहर, गावापासून खेड्यापर्यंत ही कला सादर करतात. तमाशात सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक सत्यघटनेवर आधारित वगनाट्य सादर केली जातात. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. ही कला टिकवण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे, असे खेडकर म्हणाले.