
बांधकाम साहित्य चोरणाऱ्या ३ सराईत गुन्हेगारांना अटक
चाकण, ता. २२ : येथील औद्योगिक वसाहतीत बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख ९७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अली अब्दुल रहीम साहू (वय २६, रा. कुदळवाडी, ता. हवेली), जमाल अख्तर साबीर अहमद चौधरी (वय ३८), मोहम्मद इसरार मेहमूद शाह (वय ३२), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत अनिलकुमार श्रीधरण पणीकर (वय ५०, रा. देहू रोड) या बांधकाम व्यावसायिकाने पोलिसात फिर्याद दिली आहे. सावरदरी (ता. खेड) येथे ५ ते ६ एप्रिलच्या दरम्यान आरोपींनी बांधकामासाठी लागणारे लोखंडी सेंट्रींग प्लेटा, लोखंडी पाइप व इतर साहित्य चोरून नेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांना याबाबत काही माहिती मिळाल्यानंतर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपींकडून सुमारे ७ लाख ९७ हजार रुपये किमतीचा माल, टेम्पो जप्त केला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर, पोलिस निरीक्षक किशोर पाटील, पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी, सहायक पोलिस फौजदार थेऊरकर, पोलिस हवालदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, पोलिस नाईक संतोष काळे, किशोर सांगळे, वडेकर, जमदाडे, शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड यांनी केली.