चाकण परिसरात बिगर क्रमांकाच्या वाहनांची धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण परिसरात बिगर क्रमांकाच्या वाहनांची धूम
चाकण परिसरात बिगर क्रमांकाच्या वाहनांची धूम

चाकण परिसरात बिगर क्रमांकाच्या वाहनांची धूम

sakal_logo
By

चाकण, ता. २७ : चाकण शहर व परिसरामध्ये बिगर क्रमांकाच्या वाहनांचा मुक्त संचार आहे. अनेक मोटारींच्या नंबर प्लेट काढून शहरात फिरण्याचा गैरप्रकार सध्या सुरू आहे. या वाहनांना वाहतूक विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगावरही मोटारी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्या अडविता येत नाहीत. शहरात सध्या चार मोटारी बिनधास्तपणे पोलिसांच्या डोळ्यादेखत फिरत असल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

औद्योगिक वसाहतीत चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. चोऱ्या रोखण्याचे पोलिस प्रयत्न करत आहेत पण चोऱ्यांच्या घटनांत गुन्हेगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरटे तसेच सराईत गुन्हेगार बिगर क्रमांकाची वाहने वापरत असल्याची चर्चा आहे. काही गुन्हेगार सराईतपणे वाहन क्रमांक नसलेल्या आलिशान मोटारी वापरतात. सध्या बिगर क्रमांकाच्या चार मोटारी चाकण शहरातून फिरतात. वाहतूक विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी याबाबत त्यांना हटकले तर संबंधित भरधाव वेगात निघून जातात, असे पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र आदलिंग यांनी सांगितले.

संबंधितांवर कारवाईची मागणी
चाकण येथील तळेगाव चौकात, माणिक चौकात, आंबेठाण चौकात या बिगर क्रमांकाच्या मोटारी आल्या की त्यांना अडविण्याचा त्या वाहनाचा फोटो काढण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाच्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी किंवा अन्य कर्मचाऱ्यांनी केला तर ते मोटारचालक अगदी त्या पोलिस कर्मचाऱ्यावर वाहन घालण्याचा प्रयत्न करतात. बिगर क्रमांकाच्या मोटारी या चाकण औद्योगिक वसाहत परिसर तसेच चाकण, महाळुंगे परिसरात बिनधास्तपणे फिरविल्या जातात. ज्या मोटारीवर क्रमांक नाहीत त्या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी पकडाव्यात व संबंधितांवर कारवाई करावी, अशी नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे.

चाकण शहरात बिगर क्रमांकाच्या मोटारी फिरत आहेत. वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यावर हे संबंधित चालक त्याच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी विशेषतः : महिला पोलिस कर्मचारी यांना पुढे जाऊन कारवाई करता येत नाही. त्यांच्यावर योग्य पद्धतीने कारवाई केली जाईल.
-चंद्रशेखर चौरे, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग