
चाकणमध्ये गुजराती परवलची तीन टन आवक
चाकण, ता.४ : येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात गुजरात राज्यातून आलेल्या गुजराती परवल या भाजीला मोठी मागणी होती. बाजारात परवलची आवक सुमारे तीन टन आवक झाली. तसेच हिरव्या वाटाण्याला घाऊक बाजारात प्रति किलोला ६० ते ७० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे यांनी दिली.
चाकण (ता.खेड) येथील महात्मा फुले बाजारात सध्या परराज्यातून मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक होत आहे. गारपीट व वादळी वारा, मोठा पाऊस त्यामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या कर्नाटक राज्यातून हिरव्या मिरच्याची आवक झाली आहे, अशी माहिती व्यापारी रवींद्र बोराटे, महेंद्र गोरे, कुमार गोरे, आबा गोरे यांनी दिली.
वीस टनांवर हिरव्या मिरचीची आवक झाली. हा वाटाणा चांगल्या प्रतीचा आहे. बाजारात टोमॅटोला घाऊक बाजारात प्रति किलोला २० रुपये भाव मिळाला. टोमॅटोच्या भावात १५ रुपयाने मोठी वाढ झाली. टोमॅटो हा स्थानिक भागातून येत आहे गेल्या आठवड्यात टोमॅटोचे भाव फारच घसरले होते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिले. टोमॅटोचे भाव अगदी किलोला एक, दोन रुपये बाजारात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. टोमॅटोचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कोबी, फ्लॉवर ला एका किलोला घाऊक बाजारात फक्त पाच रुपये एवढा अत्यल्प भाव मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. सध्या स्थानिक परिसरातून अत्यल्प प्रमाणात भाजीपाला, फळभाज्या विक्रीला येत आहे. गारपिटीमुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परराज्यातून मोठ्या प्रमाणात फळभाज्या विक्रीस येत आहे. किरकोळ बाजारात मात्र हिरवा वाटाणा शंभर रुपये एका किलोने विकला जात आहे.
05464