
चाकणच्या दुय्यम निबंधक कार्यालय आग
चाकण ता. ४ : येथील चाकण -शिक्रापूर मार्गावरील शासकीय दुय्यम निबंधक कार्यालयाला आज (ता.४) सकाळी आग लागली. आगीच्या भक्षस्थानी प्रिंटर, स्कॅनर, एक संगणक पडला. यामुळे अंदाजे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले. आग विद्युत शॉर्टसर्किटने लागली असा संशय आहे, मात्र वीस मिनिटांत ती आटोक्यात आणली, अशी माहिती प्रभारी दुय्यम निबंधक सुनील वगरे यांनी सांगितले.
चाकण येथे चाकण-शिक्रापूर मार्गावरील विशाल गार्डन या गृहप्रकल्पात शासकीय दुय्यम निबंधक कार्यालय आहे. दस्तऐवजांची नोंदणी येथे केली जाते. आज सुट्टीचा दिवस असल्याने कार्यालय बंद होते. येथील सुरक्षा रक्षकाला तसेच झाडलोट करणाऱ्या काही महिलांना कार्यालयातून धूर येत असल्याचे सकाळी अकराच्या सुमारास समजले. त्यांनी ही माहिती गृह प्रकल्पातील काही स्थानिक लोकांना तसेच इतरांना दिली. आग भडकल्यानंतर साडेअकराच्या सुमारास मोठी आग लागली. यात कार्यालयातील साहित्य मात्र जळून खाक झाले. काही कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. दरम्यान, चाकण नगर परिषदेच्या अग्निशमन आगीची माहिती मिळताच पंधरा ते वीस मिनिटात आग आटोक्यात आणली.
यावेळी ॲड.अतुल घुमटकर, विशाल झरेकर व इतर उपस्थित होते. काही वकील मंडळींनी व स्थानिक इतरांनी आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले. दरम्यान, आग आटोक्यातआल्यामुळे दुसऱ्या कक्षातील असलेले दस्तऐवज मात्र शाबूत राहिले.
05475