व्यवसायिकाला मारहाणप्रकरणी तिघांना अटक
चाकण, ता. ३ : येथील चाकण- शिक्रापूर मार्गावरील बहुळ (ता. खेड) गावच्या हद्दीतील हॉटेल एस. के.चे मालक सतीश गव्हाणे यांना तिघा चोरट्यांनी लाकडी दांडके व पीव्हीसी पाइपने जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील पंधरा तोळे सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली होती. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक सतीश कुंडलिक गव्हाणे (वय -५७, मूळ रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर चाकण पोलिसांनी बारा तासात चोरीची उकल करून तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले.
आरोपी श्रीराम संतोष होले (वय २५,रा. होलेवाडी ता. खेड) प्रतीक ऊर्फ बंटी दत्तात्रेय टाकळकर( वय २१,रा. टाकळकरवाडी, ता. खेड), बबलू रमेश टोपे (वय २३, रा.वाकी बुद्रुक ता. खेड) यांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याची चैन सह दुचाकी आदी तीन लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.अशी माहिती पिंपरी -चिंचवडचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील,चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.
आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर जबरी चोरी, अवैध शस्त्र बाळगणे असे विविध गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलिस आयुक्त संजय शिंदे,अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गौर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे,तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक विनोद शेंडकर, सागर बामणे, अभिजित चौगुले, सहायक फौजदार सुरेश हिंगे, पोलिस हवालदार राजू जाधव, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, नितीन गुंजाळ, निखिल वर्पे,प्रदीप राळे, सुनील भागवत,संदीप गंगावणे मंगेश फापाळे, महेश कोळी यांनी केलेली आहे.
05816