पुणे- नाशिक रेल्वे पूर्वीच्याच मार्गाने व्हावी

पुणे- नाशिक रेल्वे पूर्वीच्याच मार्गाने व्हावी

Published on

चाकण/ आळेफाटा, ता. ९ : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग होता तसा राहावा, अशी मागणी नागरिकांसह राजकीय नेत्यांनी केली आहे. जुनाच मार्ग योग्य असून या मार्गामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतीमालाची, चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या मालाची ने-आण तसेच परिसरातील पर्यटन, आर्थिक विकासाला चालना मिळेल असे येथील नागरिक, व्यावसायिक, उद्योजकांचे म्हणणे आहे.
पुणे ते चाकण, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुका मार्गे संगमनेर, सिन्नर, नाशिक असा या रेल्वेचा जुना मार्ग आहे. तर, जुन्नर तालुक्यातील ‘जीएमआरटी’चे कारण देऊन नव्याने पुणे ते अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक मार्गाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, सिन्नर या तालुक्यांतील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याविषयी संगमनेर, सिन्नर तालुक्यांत बैठका घेऊन नवीन मार्गाला विरोध दर्शविण्यात आलेला आहे.
पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कड, उपाध्यक्ष राजू चौधरी तसेच उद्योजक सुधीर मुंगसे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, ‘‘पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा जुन्या मार्गानेच व्हायला हवा. जुना मार्ग हा उत्तर पुणे जिल्हा, संगमनेर, सिन्नर भागातून जातो. शेतीमालाची तसेच औद्योगिक वसाहतीतील कंपनीतील मालाची ने-आण करण्यासाठी हा मार्ग या भागातूनच होणे गरजेचे आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याचाही हा एक पर्याय आहे. जीएमआरटी प्रकल्पाचे कारण सांगून रेल्वे मार्ग बदलणे हे चुकीचे आहे.’’

भूसंपादनाचे काय होणार?
या लोहमार्गासाठी पुणे, अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातून जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. या मोबदल्यात ३१७ कोटी रुपयांचे वाटपही झाले आहे. त्याचे नेमके काय होणार, हा प्रश्न चर्चेत आहे, तसेच हा मार्ग राजकारणाच्या आखाड्यात अडकलाय का, अशीही चर्चा होत आहे.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे जुन्या मार्गानेच व्हावी. नवीन मार्गाविरोधात जनआंदोलन करणार आहोत. उत्तर पुणे जिल्हा तसेच संगमनेर, सिन्नर भागाच्या विकासासाठी तसेच पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी हा मार्ग आवश्यक आहे. संगमनेर भागातील हजारो लोक कामासाठी चाकण परिसरात आहेत. त्या लोकांना ये-जा करण्यासाठी हा मार्ग आवश्यक आहे.
- सत्यजित तांबे, आमदार

जुन्नर तालुक्यातील नागरिकांची नाराजी
पुणे, नाशिक, अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांतील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या व अनेक वर्षांपासून रखडलेला रेल्वे मार्ग बदलण्यात आल्याने जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गामुळे जुन्नर भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल अत्यंत कमी वेळेत इतर बाजारात पोहोचणार आहे. परंतु, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी ‘जीएमआरटी’मुळे हा मार्ग बदलण्यात आल्याचे सांगितल्याने येथील शेतकरी, कामगार व प्रवासी नागरिकांनी याबाबत खेद व्यक्त केला आहे. तसेच, जुन्या मार्गाने हा प्रकल्प व्हावा, अशी मागणीही केली आहे.

जुन्या मार्गाबाबत...
या मार्गाची लांबी २६४.६० किलोमीटर असून स्थानकांची संख्या २४ आहे. यामध्ये १३ क्रॉसिंग आणि ११ ध्वज आहेत. पुण्याहून सुटून हडपसर, मंजिरी, कोळवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबुत, साकूर, अंभोरे, संगमनेर, देवठाण, चास, दोडी, सिन्नर, मोहादरी, शिंदे आणि नाशिक रोड असा जुना मार्ग असून ही रेल्वे स्थानके होती.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा सतत पाठपुरावा केला आहे. केंद्र सरकारने मार्ग बदलला असला तरी हा रेल्वे मार्ग पूर्वीप्रमाणेच करण्याची मागणी करणार आहे. यासाठी वेळप्रसंगी आंदोलनही करू.
- डॉ‌. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा

केंद्र शासनाने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा मार्ग बदलला असला तरी हा मार्ग ठरल्याप्रमाणेच होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी राज्य शासनामार्फत पाठपुरावा सुरू आहे.
- शरद सोनवणे, आमदार, जुन्नर.


फोटो ः खेड तालुक्यात समाज माध्यमावर व्हायरल होत असलेल्या प्रतिक्रिया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com