महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तीन लाखांचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेच्या तोंडात बोळा कोंबून
तीन लाखांचे दागिने लंपास
महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तीन लाखांचे दागिने लंपास

महिलेच्या तोंडात बोळा कोंबून तीन लाखांचे दागिने लंपास

sakal_logo
By

चास, ता. ४ ः शेतात काम करणाऱ्या ६५ वर्षीय शेतकरी महिलेच्या तोंडात बोळा कोंबत मारहाण करून तिच्या गळ्यातील व कानातील तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या २ चोरट्यांपैकी एकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, मात्र एक चोरटा दागिने घेऊन फरार झाला. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना वाजवणे (ता. खेड) येथे सोमवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडली.

खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाजवणे येथील जनाबाई धोंडिभाऊ आंद्रे या साकुर्डी फाट्याजवळील शेतात काम करीत होत्या. गोरक्षनाथ भगवान पिंगळे (रा. वडगाव काशिंबे, ता. आंबेगाव ) व देशराज दिलीप होले (रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड) तेथे रस्ता विचारण्याच्या बहाण्याने आले. जनाबाईंच्या डोक्याला बांधलेला स्कार्प काढून तो त्यांच्या तोंडात कोंबून अंगावरील सोने त्यांनी ओरबाडून नेल्यानंतर जनाबाईंनी आरडाओरड केल्यावर जवळपासच्या शेतात असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जनाबाई यांचे पुतणे चंद्रकांत आंद्रे जवळच होते, त्यांनी तत्काळ गावातील व परिसरातील युवकांना फोनवर माहिती दिली. चोरटे त्यांच्या एमएच-१४ एचएस ६६१२ या दुचाकीवरून पळून जात असताना गावातील तरुणांनी त्यांचा पाठलाग केला.


औदर आणि देवोशी गावाकडून मोठ्या संख्येने ग्रामस्थ येत असल्याने त्यांनी गाडी सोडून शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणांनी दोघांपैकी एकाला पकडून भरपूर चोप देत त्याला पोलिसांच्या हवाली केले. या झटापटीत एक सराईत चोरटा दागिने घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.
जनाबाई आंद्रे याचा मुलगा अरुण धोंडिभाऊ आंद्रे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक काबुगडे करीत आहेत. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली असून, महिला वर्गात भीती पसरली आहे.
------------------