
बिबट्या माणसाला टाळणारा प्राणी
चास, ता. १९ : ''''आदिवासींना मानव वन्यप्राणी संघर्ष नवा नाही. परंतु काळानुसार मानव आणि वन्य प्राणी यांची वागण्याची परिभाषा बदलली आहे. बिबट्या हा प्राणी एकटा राहणारा, रात्री फिरणारा, घाबरट आहे. तो माणसाला टाळणारा प्राणी आहे. मात्र, अन्नाचा शोधार्थ तो मानवी वस्तीकडे फिरकू लागला आहे. सावधानता बाळगल्यास बिबट्या व मानव संघर्षातून होणारे अपघात टाळता येतील'''' असे स्पष्ट मत रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे वन्यजीव अभ्यासक नचिकेत उत्पात यांनी भोरगिरी (ता. खेड) व्यक्त केले.
एस. एम. सुपे मेमोरिअल फाउंडेशन, महाराष्ट्र शासन वनविभाग, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य विभाग, यांच्या संयुक्त सहभागाने बिबट्याचा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले लक्ष्मण वनघरे यांच्या स्मरणार्थ ''मानव वन्यप्राणी संघर्ष टाळणे'' या विषयावरील चर्चासत्र भोरगिरी येथे पार पडले. याप्रसंगी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे वन्यजीव अभ्यासक नचिकेत उत्पात व श्रीनाथ चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. प्रसंगी एस.एम सुपे मेमोरिअल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संतोष सुपे, वन विभागाचे परिमंडळ अधिकारी चेतन नलावडे, वनपाल कौशल्या पवार, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याचे जे. बी. सानप, वनपाल ए. ए. भालेकर व लीलावती नेत्रालयचे डॉक्टर राहुल जोशी उपस्थित होते.
उत्पात पुढे म्हणाले की, बिबट्या कधीही समूहाने फिरत नाही. मनुष्य हे त्याचे खाद्य नाही. तो जंगलातून मानवी वस्तीमध्ये फक्त खाद्यासाठी येतो. कुत्री, वासरे, शेळ्या, मेंढ्या व छोटे प्राणी हे त्याचे खाद्य आहे.त्यामुळे प्राण्यांविषयीच्या सवयींचा अभ्यास गरजेचा असून जंगलातून जाताना किंवा रस्त्यावरून जाताना एकटे जाऊ नये, समूहाने एकत्रित जावे. जाताना गप्पा माराव्यात, आवाज करत जावे, काठीला एखादा घुंगरू लावावे, खाली बसू नये. ही काळजी घ्यावी.
दरम्यान, लीलावती हॉस्पिटलचे नेत्रतज्ञ डॉ. राहुल जोशी यांनी उपस्थितांची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान करून उपस्थितांचे आभार मानले. चर्चासत्रात महिपत सुपे, भागोजी काठे, लक्ष्मण काठे, भिमाजी धादवड, संजय विरणक सहभाग घेतला होता. जे. बी. सानप यांनी प्रास्ताविक तर सुदाम सुपे यांनी सूत्रसंचालन केले.
वनविभाग व अभयारण्य यांना मानवाच्या जीवनाची किंमत आहे, कर्त्या माणसाचे निधन झाल्यानंतर कुटुंब कोलमडून जाऊ नये यासाठी वन विभागाने वन्य प्राणी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना मदत देण्याची तरतूद केलेली आहे. पैशाने गेलेल्या माणसाचा जीव परत येणार नसला तरी त्या कुटुंबाला आधार देणे ही शासनाची जबाबदारी आहे म्हणून ही मदत केली जाते.
-चेतन नलावडे, वन परिमंडळ अधिकारी
------------------
00634