टोकावडे येथे अंगणवाड्यांचा बालआनंद मेळावा

टोकावडे येथे अंगणवाड्यांचा बालआनंद मेळावा

चास, ता. २५ : टोकावडे (ता. खेड) या परिसरात शाश्वत संस्थेच्यावतीने सात अंगणवाड्यानी एकत्रितपणे बालआनंद मेळावा साजरा केला. या मेळाव्यात ३८ बालकांनी सहभाग घेतला होता. त्यामधील विजयी स्पर्धकांना बक्षीस वाटप केल्याची माहिती शाश्वत संस्थेच्या विश्र्वस्त प्रतिभा तांबे यांनी दिली. शाश्वत संस्था ही आंबेगाव व खेड दोन्ही या तालुक्यात आदिवासी भागातील प्रश्नावर काम करीत असते.

या मेळाव्याप्रसंगी बेडूक उडी, बादलीत बॅाल टाकणे, शर्टाला बटन लावणे, बाटलीत न सांडता पाणी भरणे, गाणी म्हणणे, गोष्ट सांगणे, हात वरती करून लोळत जाणे या स्पर्धा घेण्यात आल्या.

या बालवाड्यांसाठी पुणे येथील सिनेक्रॅान कंपनी व आर. व्ही नाईक ट्रस्ट सातारा यांचे अर्थ साहाय्य मिळालेले असून बालवाडीतील मुलांना रोजच्या आहारात, पौष्टिक खाऊ म्हणून मोडाचे मुग, मटकी, हरभरा तसेच गुळाची लापशी, रवा व खिचडी भात, थंडीत रोज एक अंडे याशिवाय खजूर, शेंगदाणा लाडू, राजगिरा वडी आदी पदार्थ सहा दिवस दिला जातो.

येथील शिक्षिकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण ही संस्थेमार्फत दिले जात असून मुलांना गणवेषही दिला जातो. आदिवासी भागातील प्रश्नावर काम करीत असताना त्यातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कातकरी, ठाकर समाजातील मुले पालंकाबरोबर कुठेही कामाच्या ठिकाणी जातात, तिथे त्यांचे शारीरिक, मानसिक, भावनिक हाल होतात, ते होऊ नये म्हणून हया बालवाड्या संस्था चालवीत असून त्यातून मुलांचे भावनिक विश्वच नाही तर कुपोषणही कमी करण्यासाठी साठी प्रयत्न सुरू आहे. १६५ मुले सध्या दोन्ही तालुक्यातील या संस्थेत असून स्पर्धांमुळे मुलांना विविध खेळांची माहिती मिळतेच पण सराव मिळतो आहे.

यावेळी बॅटबॉल सेट, लिगोरचा सेट, टेनिस बॅट सेट, स्मायली बॉल, प्लास्टिक बॉल आदी साहित्य मुलांना बालवाडीत खेळण्यासाठी तसेच बक्षिस म्हणूनही वाटप केले. या कार्यक्रमानंतर मुलांना वरण, भात, भाजी, केळी, गुलाब जाम असा पोषक आहार दिले.

या कार्यक्रमाला बालवाडी शिक्षिका
येळवलीच्या सुवर्णा बानेरे, दिपनगरच्या मंगल पवार, भिसे वस्तीच्या रेखा गोपाळे, विठ्ठल वाडीच्या सुनीता मुकणे, मुऱ्हे वस्तीच्या सीमा मुऱ्हे, न्हावाची वाडीच्या उज्वला कावळे, वाडा ठाकर वस्तीच्या रेखा भांगे तसेच सुपरवायझर श्यामल गोपाळे, नीलेश काठे, शांताराम गुंजाळ, बालवाडी प्रमुख प्रतिभा तांबे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com