धरणांतर्गत बुडीत बंधारे सर्वप्रथम बांधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धरणांतर्गत बुडीत बंधारे सर्वप्रथम बांधा
धरणांतर्गत बुडीत बंधारे सर्वप्रथम बांधा

धरणांतर्गत बुडीत बंधारे सर्वप्रथम बांधा

sakal_logo
By

चास, ता.१ : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील खरोशी, एकलहरे, धामणगाव, डेहणे, शेंदुर्ली, वांजळे, धामणगाव, धुवोली, मोरोशी, शिरगाव, टोकावडे, मंदोशी, नायफड या गावांच्या पाणीयोजना योजना जवळपास नदीपात्रात आहेत. ज्यावेळी भीमा नदी पात्रातील पाणी धरणातून खाली सोडले जाते त्यावेळी नदीपात्र कोरडे पडल्यावर नदीपात्रात असणाऱ्या विहिरींची पाण्याची पातळी देखील कमी होते, त्यामुळे उन्हाळ्यात या गावांना विहिरीला पाणी नसल्यामुळे पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. यासाठी धरणांतर्गत बुडीत बंधारे सर्वप्रथम बांधा, अशी मागणी पाणी टंचाईग्रस्त भागातील शेतकरी करत आहेत.

खेड तालुक्याचा पश्चिम पट्ट्यात सद्य स्थितीत शासनाने ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना सुरू केल्या असून, गावांसाठी लाखो-करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अनेक गावांना पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू झाली आहेत. मात्र उन्हाळ्यात ही संकल्पना किती उपयुक्त ठरले याबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे. चास-कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत असून साधारण जानेवारी महिन्यापासून चास कमान धरणातून कालव्याव्दारे पाण्याचे आवर्तन सुरू झाल्यावर टप्याटप्याने पाणलोट क्षेत्रातील गांवामध्ये भीमा नदीपात्रातील पाणीसाठा संपुष्टात येतो. नदीपात्रातील पाणीसाठा संपुष्टात आल्यावर नदीपात्रात असणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या विहिरींचेही पाणी संपुष्टात येते व गावोगावी पाणीटंचाई सुरू होते. ही गेली पंचवीस ते अठ्ठावीस वर्षातील परिस्थिती आहे, असे सुनील मिलखे, रोहिदास भाईक, विठ्ठल सोळशे, दादाभाऊ डामसे, नाथा शिर्के, प्रकाश मुऱ्हे, नवनाथ ठोसर, पांडुरंग जठार, दत्ता खाडे, शंकर कोरडे, दिनेश वाजे, दादाभाऊ शिर्के यांसह अन्य नागरिकांनी सांगितले.

''जल जीवन मिशन अयशस्वी ठरू शकते''
ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला पाहिजे. यासाठी शासनाची ''हर घर जल, हर घर नल'' ही संकल्पना राबविली आहे. मात्र, भौगोलिक
परिस्थितीचा विचार न करता सरसकट या योजना राबविल्या जात आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईमुळे भविष्यात पश्चिम आदिवासी भागातील जल जीवन मिशन अंतर्गत योजना अयशस्वी ठरू शकतात, असे मत सुनील मिलखे यांनी ''सकाळ''शी बोलताना केले.

खरोशी, एकलहरे परिसरातील नागरिकांनी धरणांतर्गत बुडीत बंधारे व्हावे यासाठी मोर्चे आंदोलने केली. परंतु अजूनही त्याची कोणी दखल घेत नाही. पश्चिम आदिवासी भागातील नागरिकांकडूनही सतत बुडीत बंधाऱ्याची मागणी होत आहे. आम्ही पश्चिम आदिवासी भागातील सर्व महिला नागरिक पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करू.
- शरद जठार, उपसरपंच, धुवोली (ता. खेड)

00686