
कळमोडी धरणातून नदीत सोडले पाणी
चास, ता. ९ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील नागरिकांच्या मागणीवरून कळमोडी (ता. खेड) धरणातून आरळा नदीपात्रात गुरुवारपासून (ता. ९) पिण्यासाठी पाणी सोडण्यास सुरवात झाल्याची माहिती जलसंपदा प्रशासन विभागाने दिली.
कळमोडी धरणात सध्या ९६.४६ टक्के (१.४५ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाखाली असणाऱ्या कळमोडी, चिखलगाव, साकुर्डी, कहू, कोयाळी यांसह अन्य गावाजवळून वाहणाऱ्या आरळा नदीच्या पात्रात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही सोय होणार आहे, या शिवाय नदीकिनारी असणाऱ्या पाणीयोजनाही ऐन उन्हाळ्यात सुरू राहणार आहेत. कळमोडी धरणातून आरळा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरवात झाली असून, २५० क्युसेक विसर्गाने हे पाणी वरील गावांमधून जाऊन चासकमान धरणाच्या जलाशयात समाविष्ट होणार आहे. त्यामुळे चासकमान धरण्याच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा साठा शिल्लक ठेवून उर्वरित पाणी चासकमान धरणात सोडणार असल्याचेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.