
चास येथे सोमेश्र्वर मंदिराच्या नूतनीकरणाचा वर्धापनदिन
चास, ता. २६ : पेशवेकालीन वैभव असलेल्या चास (ता. खेड ) येथील सोमेश्र्वर मंदिराच्या नूतनीकरणाचा पहिला वर्धापनदिन सोमवारी (ता. २७) साजरा होणार असून त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय घनवट यांनी दिली. स्व. आमदार सुरेश गोरे यांच्या संकल्पनेतील पेशवेकालीन सोमेश्र्वर मंदिर जीर्णोद्धार व परिसराला नयनरम्य स्वरूप प्राप्त करून दिले ते शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय घनवट, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांनी व यांच्याच पुढाकाराने साकारलेल्या सोमेश्र्वर मंदिर व परिसरातील मंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा झाला. त्याला सोमवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने सोमवारी सकाळी मंदिरात अभिषेक सोहळा होणार असून सकाळी दहा वाजल्यापासून निमंत्रित भजनाच्या स्पर्धा होणार आहेत. या भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास एकवीस हजार, द्वितीय क्रमांकास पंधरा हजार व तृतीय क्रमांकास अकरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. रात्री कीर्तनकार हभप गणेश महाराज घोडके यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून त्यानंतर सामुदायिक हरिजागर होणार आहे.