
शेळकेवाडी, वरच्या सुपेवाडीला टँकरने पाणीपुरवठा
चास, ता. १६ ः वाडा (ता. खेड) गावच्या डोंगरावर वसलेल्या शेळकेवाडी व वरची सुपेवाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती गावच्या सरपंच रूपाली मोरे यांनी दिली. मात्र, शेळकेवाडी येथील खडकातील टाकीतील व सुपेवाडी येथील विहिरीतील मलबा काढल्यास पाणीटंचाई भासणार नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
शेळकेवाडी व सुपेवाडी या वस्त्या डोंगरावर वसलेल्या असून पावसाळ्यात मुसळधार पाऊस तर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असे येथील स्वरूप आहे. गेली अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होत असल्याने या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीटंचाई भासू नये म्हणून शेळकेवाडी येथे खडकातील टाकी व शेळकेवाडी येथे विहीर आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मागील वर्षी शेळकेवाडी येथील शिवकालीन खडकातील टाकीचे खोलीकरण करण्यात येऊन पाणीसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र, उकरण्यात आलेला काही मलबा खालीच राहिल्याने शंभर टक्के पाणीसाठा होवू शकला नाही. त्यामुळे सध्या टाकीत पाणी आहे. मात्र, मलब्यामुळे पाणी हिरवेगार झाले असून पाण्याला विशिष्ट प्रकारचा वास येवू लागला आहे. या बाबत बोलताना शेळकेवाडी येथील एकनाथ शेळके, अक्षय शेळके, रामदास शेळके म्हणाले, आमची वस्ती सुमारे 150 ते 160 लोकांची असून आम्हाला टँकरची गरज फक्त पिण्याच्या पाण्यासाठी लागत आहे. मात्र, खडकीतील टाकीत असणारा मलबा काढल्यास आम्हाला पुढील वर्षी टँकरची गरजच भासणार नाही. वरच्या सुपेवाडी मध्येही अशीच स्थिती असून येथील महिला चंद्रभागा सुपे, अर्चना सुपे यांनी बोलताना सांगितले की येथील विहिरीत पाणीसाठा भरपूर असला तरी विहिरीतील गाळ काढला नसल्याने विहिरीतील पाणी दूषित झाल्याने पिण्यास अयोग्य आहे. पर्यायाने सुमारे एक किलोमीटर अंतरावरील पाणीसाठ्यावरून पाणी आणावे लागते. विहिरीतील गाळ काढल्यास पाणीसाठा चांगला होवू पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासणार नाही.
या बाबत सरपंच रूपाली मोरे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीच्या वतीने विहिरीतील व खडकातील टाकीमधील गाळ काढण्याबाबत नियोजन करण्यात येईल व नागरिकांच्या सोयीसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येऊन पाण्याची कमतरता भासू देणार नाही.’’