
जऊळके-रेटवडीत बिबट्यांचा धुमाकूळ
दावडी, ता. १२ : जऊळके खुर्द (ता. खेड) येथे गुरुवारी (ता. १२) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात लता शिवाजी बोऱ्हाडे (वय ४२) या गंभीर जखमी झाल्या आहेत. येथून जवळ असलेल्या
रेटवडी (ता. खेड) येथे दोन दिवसांपूर्वीच (ता. १०) दोन बिबट्यांनी दीड तासाच्या अंतराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांवर हल्ला केला होता. तसेच, बुधवारी सकाळी एका कुत्र्याचा फडशा पाडला होता. त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरून गेले.
लता बोऱ्हाडे या सकाळी सहा वाजता जऊळके गावठाणातील त्यांच्या जुन्या घरापासून नवीन घराकडे जात असताना बिबट्याने अचानक मागून हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या तोंडावर व डोक्याला पंजाने मारून व चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. बोऱ्हाडे यांनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ जमा झाले. त्यामुळे बिबट्या पळून गेला. ग्रामस्थांनी बोऱ्हाडे यांना तातडीने चांडोली येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले, मात्र डोक्याला झालेल्या जखमा खोल असून, जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुणे येथे ससून रूग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. रौंधळ, वन परिमंडळ अधिकारी दत्तात्रेय फापाळे, शिवाजी राठोड, संदीप अरुण व शिवाजी ढोले यांनी जऊळके येथे भेट दिली. रेटवडी व जऊळके या शेजारील गावांमध्ये बिबट्याने दोन दिवसात तीन हल्ले केल्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.
बंदोबस्त करण्याची मागणी
रेटवडी येथे बुधवारी रात्री दोन वाजेपर्यंत बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांनी फटाके फोडून आरडाओरडा केला, तरीही बिबट्या त्यास दाद देत नाही. रेटवडी व जऊळके येथील महिलांवर केलेल्या हल्ल्यात साम्य असल्याने सदर बिबट्या पिसाळलेला असावा किंवा नरभक्षक होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. रेटवडी येथील शेतकरी शेतातील कामे करण्यास जाण्यासाठी घाबरत आहेत. वनविभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी रेटवडी व जऊळके ग्रामस्थांनी केली आहे.
.
Web Title: Todays Latest District Marathi News Daw22b00824 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..