
जबरी चोरीप्रकरणी दोघांना अटक
दौंड, ता. ३१ : सोनवडी (ता. दौंड) कॅार्ड लाइन रेल्वे स्थानकावर प्रवाशाला मारहाण करून लुटणाऱ्या दोन तरुणांना दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांचा पेहराव आणि शरीरयष्टीवरून अवघ्या एका तासात पोलिसांनी आरोपींना अटक केल्याची माहिती दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिली. फिरोज जगदीश यादव (वय ३७, रा. नवादा जिल्हा, बिहार) व त्याचा एक सहकारी तरुण मनमाड येथून टेंभुर्णी (जि. सोलापूर) जाण्यासाठी सोनवडी (ता. दौंड) कॅार्ड लाइन रेल्वे स्थानकावर उतरले होते. मध्यरात्री साडेबारा वाजता रेल्वे स्थानकावर करण कैलास चव्हाण (वय २२ , रा. रेल्वे कामगार मैदानाजवळ, दौंड) व रोहित चंद्रकांत गायकवाड (वय ३०, रा. गोवा गल्ली, संभाजीनगर, दौंड) यांनी फिरोज यादव यास अडवून त्याच्या डोक्यात व छातीत दगड मारले. दोघांनी मोबाईल संच व रोकड असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला. त्या दरम्यान गस्तीवर असणारे हवालदार आनंद वाघमारे यांना हा प्रकार कळताच त्यांनी जखमी प्रवाशाला उपचारासाठी रवाना केले. वरिष्ठांना या जबरी चोरीची माहिती दिल्यानंतर पोलिस पथकाने वर्णनावरून करण चव्हाण यास दौंड - पाटस अष्टविनायक मार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ पकडले.
तर दुसरा संशयित आरोपी रोहित गायकवाड याला पोलिसांनी शिताफीने पकडले. लोहमार्ग पोलिस दलाचे अधीक्षक सदानंद वायसे पाटील, उप अधीक्षक श्रीकांत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र गायकवाड, फौजदार श्रीकांत वाघमारे, हवालदार आनंद वाघमारे, मनोज साळवे, कॅान्स्टेबल सुनील कुवर यांनी या कारवाई केला.
Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01651 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..