दौंडमधील कारवायांना ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमधील कारवायांना ब्रेक
दौंडमधील कारवायांना ब्रेक

दौंडमधील कारवायांना ब्रेक

sakal_logo
By

दौंड, ता. २७ : दौंड तालुक्यात अनधिकृत शाळा बंद करण्यासह शिक्षण संस्थांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडील अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला आहे. संस्थाचालकांच्या मनमानी विरूद्ध तक्रारी करण्यासाठी सरसावलेल्या पालकांना याचा मोठा धक्का बसला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात विस्तार अधिकारी (प्राथमिक) म्हणून कार्यरत असणारे किसन भुजबळ यांनी दौंड पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून ७ एप्रिल २०२२ रोजी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील कासुर्डी येथील अभंग शिशू विहार ज्ञानमंदिर व क्रेयॅान्स इंग्लिश मिडियम स्कूल, लिंगाळी येथील ज्ञानप्रभा इंग्लिश मिडियम स्कूल, सोनवडी येथील यशश्री इंग्लिश मिडियम स्कूल व दौंड शहरातील किडझी इंग्लिश मिडियम स्कूल या अनधिकृत शाळांना टाळे ठोकले. लिंगाळी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत बालाजीनगर येथे शाळेची परवानगी व नोंदणी असताना श्री मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलचे अशोकनगर येथे परस्पर स्थलांतर केल्याप्रकरणी संस्थेला अकरा लाख रूपयांचा दंड केला. तसेच, दौंड शहरातील १०२ वर्ष जुन्या असलेल्या भीमथडी शिक्षण संस्थेकडून जादा शिक्षक मान्यतेसाठी दहा वर्षापासून अनधिकृत शाळा चालविली जात असल्याचा गंभीर प्रकार त्यांनी उघडीकस आणला होता.
दरम्यान, मंगळवारी (ता. २६) जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद यांनी एका आदेशाद्वारे भुजबळ यांचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला. शिरूर येथील विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. परंतु, बुधवारी (ता. २७) सायंकाळपर्यंत कळमकर हे पदभार स्वीकारण्यासाठी न आल्याने भुजबळ यांच्याकडे पदभार होता.

खामगावच्या संस्थेला दंड
खामगाव (ता. दौंड) येथील खंबेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माणिक के. नागवडे, संचालक मंडळ व मुख्याध्यापकांनी संगनमताने न्यू इंग्लिश स्कूल या अनुदानित शाळेत मोफत शिक्षण असताना १३५ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ५ हजार ८०० रूपये कॅपिटेशन फी म्हणून वसूल केले होते. या प्रकरणी २६ जुलै रोजी संस्थेला ७९ लाख ५० हजार रूपयांचा दंड करण्यात आला.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01702 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..