
प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पदभार देण्याची दौंडला मागणी
दौंड, ता. २८ : दौंड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार किसन भुजबळ यांना पुन्हा देण्याची मागणी करण्यात आली आहे. संस्थाचालक व शिक्षकांवर अंकुश ठेवण्यासाठी पुन्हा पदभार देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती विकास कदम यांनी ही मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात विस्तार अधिकारी (प्राथमिक) म्हणून कार्यरत असणारे किसन भुजबळ यांच्याकडे दौंड गट शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार ७ एप्रिल रोजी देण्यात आला होता. भुजबळ यांनी अत्यंत पारदर्शी कामकाज करून निष्पक्षपणे तालुक्यातील अनधिकृत इंग्रजी माध्यमांच्या सर्व राजकीय पक्षीयांशी संबंधित शाळा व संस्थांवर कारवाई केली होती. या कारवायांमुळे जिल्हा परिषद व खासगी शिक्षण संस्थांमधील कामचुकारपणा करणाऱ्या काही शिक्षकांवर यामुळे अंकुश बसला असून त्यांच्या कामकाजात शिस्त लागण्यास सुरवात झाली होती.
दरम्यान, तालुक्यात शैक्षणिक कामकाज वेळेवर व प्रामाणिकपणे सुरू झाल्याचा आनंद पालक वर्गाकडून व्यक्त होत असतानाच किसन भुजबळ यांच्याकडील दौंड येथील पदभार काढून घेतल्याने पालक वर्ग व नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कारवायांच्या माध्यमातून शासनाला दंडाच्या स्वरूपात लाखो रुपयांचा महसूल मिळणार असल्याने शिक्षण क्षेत्राचे हित पाहता त्यांच्याकडे पुन्हा पदभार देण्याची आवश्यकता आहे. या कारवाईमुळे शिक्षण संस्था चालक व शाळांवर अंकुश राहण्यासह विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01706 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..