
दौंडमध्ये लम्पी बाधित बैलाचा मृत्यू
दौंड, ता. २७ : दौंड शहरात लम्पी बाधित एका मोकाट बैलाचा मृत्यू झाला. दौंड परिसरातील ९ बाधित जनावरांपैकी ८ जनावरे उपचारानंतर बरी झाली होती. परंतु हा बैल मोकाट असल्याने आवश्यक उपचारांअभावी त्याचा मृत्यू झाला. नगरपालिका प्रशासनाकडे मोकाट जनावरे पकडून त्यांच्या लसीकरणाची यंत्रणा नसल्याने प्रतिबंधात्मक लसीकरण रखडले आहे.
दौंड शहरात २४ सप्टेंबरला एका चार वर्षीय मोकाट बैलास लम्पी झाल्याचे आढळून आले होते. त्याच्यावर प्रथमोपचार केले होते. परंतु मोकाट असल्याने त्याचा नंतर पत्ता लागला नाही. सदर बैलाच्या शरीरावर गाठी असल्याचे नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पशू वैद्यकीय उपचार केंद्रातील बुवा महानवर आणि चंद्रकांत तुपसौंदर्य यांनी जागेवर जाऊन उपचार केले होते. परंतु आज (ता. २७) पहाटे रेल्वेच्या हद्दीत हा बाधित बैल मृतावस्थेत आढळून आला, अशी माहिती प्रभारी पशू वैद्यकीय अधिकारी डॅा. डी. एच. ठूबे यांनी दिली.
दरम्यान, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी सांगितले की, पशू संवर्धन विभागाबरोबर समन्वय साधण्यात आला आहे. उद्या (ता. २८) मोकाट जनावरे पकडून लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाईल.
दरम्यान, दौंडमध्ये मोकाट जनावरांचा मुक्त संचार असून शहरात किमान २५० मोकाट जनावरे आहेत. नगरपालिकेचा गाववेशीजवळ कोंडवाडा असून, त्यावर एका संस्थेच्या पदाधिकाऱ्याने अतिक्रमण केले आहे.