दौंडच्या माजी नगराध्यक्षावर अखेर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडच्या माजी नगराध्यक्षावर अखेर गुन्हा
दौंडच्या माजी नगराध्यक्षावर अखेर गुन्हा

दौंडच्या माजी नगराध्यक्षावर अखेर गुन्हा

sakal_logo
By

दौंड, ता. ९ : दौंड शहरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणाऱ्या महिला व तरुणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्यासह एकूण आठ जणांविरुद्ध २१ दिवसांच्या विलंबानंतर गुन्हा दाखल केला आहे. दौंड पोलिसांनी विनयभंग व ॲट्रॉसिटी प्रकरणात टोळक्याविरूद्ध त्वरित कारवाई करण्याऐवजी फिर्याद नसल्याचे कारण पुढे करून कारवाई टाळली होती.
दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात २० ऑक्टोबर रोजी एका तरुणीचा रशीद शेख व इलियास शेख यांनी भररस्त्यावर विनयभंग केला. तरुणीचे नातेवाईक त्या तरुणांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्या तरूणांनी त्यांनाच दांडक्याने बेदम मारले. त्यानंतर टोळक्याने त्यांच्या घरी धुडगुस घालीत डोक्यात तलवारीने वार करण्याबरोबर दांडक्याने दात पाडून एकूण सात जणांना गंभीररीत्या जखमी केले.
या घटनेनंतर तरुणीचे कुटुंबीय दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास गेले असता संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे टोळकेच परस्परविरोधी फिर्याद देतील, अशी भीती त्यांना दाखविण्यात आली. दरम्यान, पीडित तरुणीने एका केंद्रीय आयोगाकडे धाव घेतल्यानंतर दौंड पोलिसांना बुधवारी (ता. ९) रात्री गुन्हा दाखल करावा लागला.
तरुणीच्या फिर्यादीवरून माजी नगराध्यक्ष बादशहा आदम शेख, त्याचा मुलगा वसीम बादशहा शेख, रशीद इस्माईल शेख, वाहिद खान, अरबाज सय्यद, जुम्मा शेख, इलियास इस्माईल शेख, जिलानी शेख (सर्व रा. कुंभार गल्ली, दौंड) व इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातिवाचक शिवीगाळ करणे, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करणे, आदी प्रकरणी गुन्हा दाखल केला.
बादशहा शेख हा सलग २९ वर्षे नगरसेवक होता व त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दौंड नगरपालिकेतील गटनेता आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य म्हणून काम पाहिले आहे. दीड दशकापूर्वी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी नामंजूर केला होता.