
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या दौंडमधील व्यापाऱ्याचा मृत्यू
दौंड, ता. ६ : दौंड शहरातील खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेला तरुण व्यापारी विशाल शांतिलाल दुमावत याचा सात दिवसानंतर मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली.
दौंड शहरातील भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भांड्याचे व्यापारी विशाल दुमावत (वय ३७, रा. पंचायत समिती समोर, दौंड) याने २९ जानेवारी रोजी सकाळी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शनिवारी (ता. ४) रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याने मागील चार वर्षात दुकानासाठी नऊ खासगी सावकारांकडून मासिक १० ते २० टक्के व्याजदराने तब्बल पंचवीस लाख रुपये घेतले होते. मुद्दल व व्याजाची रक्कम दिल्यानंतरही संबंधित सावकार दुकानात येऊन दमदाटी आणि शिवीगाळ करीत आणखी पैशांची मागणी करीत होते. त्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे.
नऊ जणांवर गुन्हा
विशाल याच्या पत्नीने दौंड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दोन महिलांसह एकूण नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी नऊ संशयितांपैकी निखिल पळसे (वय २६, रा. महात्मा गांधी चौक) व रवी सॅमसन गायकवाड (वय ३४, रा. गोवा गल्ली, दौंड) या दोघांना अटक केली.