
सोनवाडीतील धरणग्रस्त आंदोलनाच्या पवित्र्यात
दौंड, ता. २२ : वीर धरणाच्या निर्मितीसाठी शेतजमिनी देणाऱ्या २६ कुटुंबांचे सोनवडी (ता. दौंड) येथे स्थलांतर करण्यात आले असले, तरी गेल्या सहा दशकांपासून त्यांच्या जमिनींची नोंद नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. पुनर्वसन करण्यासह मूलभूत सुविधा ने देता धरणग्रस्तांची सहा दशके चेष्टा केल्याच्या निषेधार्थ वीर धरणग्रस्त हित व संरक्षण कमिटीचे प्रमुख धनाजी धुमाळ यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सोनवडी येथील राखीव जमिनीवर सीमांकन करून २६ धरणग्रस्त कुटुंबांचे सन १९६३ मध्ये स्थलांतर करण्यात आले. तत्कालीन पुनर्वसन अधिकारी यांनी धरणग्रस्तांना तीन हजार रुपये कर्ज दिले होते. परंतु, शासन दरबारी मागणी करूनही धरणग्रस्तांच्या जमिनींची कुठेही नोंद केली नाही. वारंवार संबंधित पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, भूमी अभिलेख कार्यालय आणि ग्रामपंचायतीकडे मागणी आणि पाठपुरावा करून देखील प्रत्येक कार्यालयाने टोलवाटोलवी करीत कनिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवत जबाबदारी टाळली आहे. त्यामुळे नोंदी अभावी कुटुंबांना जमिनीच्या आधारे उद्योग-व्यवसाय आणि शिक्षणासाठी कर्ज मिळत नाही. जमिनींचे हस्तांतरण देखील होत नाही. त्याचबरोबर पिण्याचे पाण्यासाठी रोज खर्च करावा लागत आहे. सांडपाणी व्यवस्था अस्तित्वात नसल्याने आजारांनी ही कुटुंबे ग्रस्त आहेत.