
दौंडमधील अंगणवाडी सेविकांचे आंदोलन
दौंड, ता. २७ : दौंड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढ व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. तालुक्यातील ४२२ अंगणवाड्या २० फेब्रुवारीपासून बंद आहेत.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या दौंड तालुका शाखेच्या वतीने सोमवारी (ता. २७) पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या जिल्हाध्यक्षा आशाबी शेख, दौंड तालुकाध्यक्षा रेखा शितोळे, सचिव सुवर्णा शितोळे, उपाध्यक्षा किरण जांभळे, मीना कुल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करणे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, मराठीतून पोषण ट्रॅकर हे मोबाईल अॅप्लिकेशन उपलब्ध करून देणे व ग्रॅच्युइटी देणे, या मुख्य मागण्यांसाठी आंदोलन केले. त्याचबरोबर सेवानिवृत्तिवेतन सुरू करणे, अंगणवाडी केंद्राचे भाडे वाढविणे, बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या रकमेमध्ये वाढत्या महागाईनुसार वाढ करणे, शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांमधून पर्यवेक्षिकांची पदे भरणे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन पंचायत समितीचे अधिकारी यांना सादर केले.
दौंड तालुक्यात ४२२ अंगणवाडी सेविका व ३३५ मदतनीस आहे. शासनाकडून सध्या अंगणवाडी सेविकांना ८३००, मिनी अंगणवाडी सेविकांना ५८०० व मदतनीस यांना ४२०० रुपये मासिक मानधन दिले जात आहे.
दौंड : पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलनात सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविका.