
नानवीज येथील शेतकऱ्याची फसवणूक
दौंड, ता. १ : नानवीज (ता. दौंड) येथील शेतकऱ्यास ऊस तोडणीकरिता मजुरांची टोळी पुरवण्याच्या आमिषाने मुकादमाने साडेपाच लाख रुपयांची उचल घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दौंड पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, नानवीज येथील उद्धव जयसिंग पाटोळे यांनी भूषण जालम पाटील व जालम रामराव पाटील (दोघे रा. अंधेरी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. भूषण आणि त्याचा वडील जालम पाटील यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये ऊस तोडणी हंगाम २०२२-२०२३ करिता तोडणी मजुरांची टोळी पुरवितो, असा करार करून पाटोळे यांच्याकडून वेळोवेळी एकूण आठ लाख तीस हजार रुपये बॅंक खात्यात ऑनलाइन ट्रान्स्फर पद्धतीने, रोखीने व फोन पेद्वारे स्वीकारले. मात्र, दोघांनी टोळ्या न पुरविता त्यांची फसवणूक केली. दरम्यान नोव्हेंबर २०२२ मध्ये पाटोळे हे अंधेरी येथे गेले असता त्यांना जालम पिता-पुत्राने २ लाख ८० हजार रुपये परत केले. मात्र, त्यानंतर वारंवार मागणी करूनही टोळ्या न पुरविल्याने आणि उर्वरित रक्कम न दिल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.