
लग्नाला नकार दिल्याने दौंडला तरुणीची आत्महत्या
दौंड, ता. १२ : दौंड शहरात प्रियकराने लग्नास नकार दिल्याने एका बावीस वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. दौंड पोलिसांनी या प्रकरणी प्रियकराविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, साक्षी मोरोपंत गायकवाड (वय २२, रा. स्वप्नयोग अपार्टमेंट, लाल चर्च रस्ता, दौंड) या तरुणीने रविवारी (ता. १२) चारमजली अपार्टमेंटच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. ती शहरातील एका खासगी रूग्णालयातील पॅथोलॅाजी लॅबमध्ये नोकरी करत होती. निखिल साबळे (रा. मोरे वस्ती, कुरकुंभ रोड) या तरुणाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते. तिने लग्न करण्याचा प्रस्ताव दिल्यावर त्याने नकार दिल्याने ती तणावात होती. शनिवारी (ता. ११) तिने याबाबत तिचा भाऊ कौशल गायकवाड याला माहिती दिली. त्याने तिची समजूत काढली होती, परंतु घरातील सर्व सदस्य झोपी गेल्यानंतर तिने आत्महत्या केली, असे कौशल गायकवाड याने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
पोलिसांनी फिर्यादीनुसार निखिल साबळे या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उप निरीक्षक सुनीता चवरे या करीत आहेत.