मतदारांकडून विरोधकांचा अहंकार पराभूत : कुल

मतदारांकडून विरोधकांचा अहंकार पराभूत : कुल

दौंड, ता. ३० : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातील जागा चारशे मतांच्या फरकाने जिंकण्याचा दावा करणाऱ्या विरोधकांचा अहंकार मतदारांनी पराभूत केला आहे. निम्म्या जागा जिंकल्या तरी आम्ही जल्लोष करीत आहोत. मात्र, विरोधकांना निकालानंतर तोंड लपवावे लागले, अशी बोचरी टीका विधिमंडळ हक्कभंग समितीचे अध्यक्ष तथा दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे.

दौंड शहरात पत्रकार परिषदेत बोलताना राहुल कुल यांनी ही टीका केली. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, माजी नगरसेवक नंदकुमार पवार यांच्यासह नामदेव बारवकर, महेश भागवत आदी उपस्थित होते.

राहुल कुल म्हणाले, ``दौंड बाजार समिती ही आपलीच प्रॉपर्टी समजून विरोधक निवडणूक लढवत होते. परंतु मतदारांनी भाजप पुरस्कृत पॅनेलला १८ पैकी ९ जागा देत त्यांचा हा भ्रम दूर केला. बाजार समिती यापूर्वी फक्त राजकारणासाठी वापरली गेली. काही ठराविक लोकांचेच तेथे प्राबल्य होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी बदलाच्या दिशेने कौल दिला आहे. ``
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, `` विरोधकांच्या ताब्यातील दौंड खरेदी विक्री संघातील गैरव्यवहार आणि बाजार समितीमधील कारभार कशा पध्दतीने सुरू होता, हे मतदारांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. आम्ही बाजार समिती गतिमान करू. असुविधा दूर करून ग्राहक, व्यापारी आणि शेतकरी यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. शेजारील तालुक्यातील बाजार समित्या विकसित होत असताना दौंड बाजार समिती देखील विकसित करू.``
-----
संजय राऊत राष्ट्रवादीचे नेतृत्व करीत आहेत...
दौंड बाजार समिती निवडणुकीच्या दोन दिवस आधी विरोधकांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर आरोप करण्यासाठी राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना वरवंड येथे सभेसाठी बोलविले. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतृत्व संजय राऊत करीत असल्याचे चित्र दिसले. स्वत: वर विश्वास नसल्याने विरोधकांना बाहेरची कुमुक मागवावी लागते. आम्ही सक्षम असल्याने व सर्वसामान्य जनतेवर अवलंबून असल्याचा दावा आमदार राहुल कुल यांनी केला.
02344

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com