
दौंडमधील भररस्त्यात दहशतीचा प्रयत्न
दौंड, ता. ८ : दौंड शहरात भररस्त्यावर हातात धारदार शस्त्र घेऊन लूटमार करणाऱ्या दोन तरुणांना दौंड पोलिसांनी अटक केली. दुचाकी वाहनांच्या काचा फोडून व चाकू उगारून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, प्रदीप ऊर्फ गणेश महेश कोळी (वय २२, रा. तेलगू कॅालनी, संभाजीनगर, दौंड) व अमोल गायकवाड (वय २२, रा. शालीमार चौक, दौंड) या दोन तरुणांना अटक केली आहे. शनिवारी (ता. ६) रात्री दौंड-सिद्धटेक रस्त्यावर श्री सिंधी धर्मशाळेसमोर गणेश कोळी व अमोल गायकवाड या तरुणांनी हातात मोठा चाकू घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मल्लिकार्जुन सिद्धराम मुनमुटगी (रा. दौंड) हे दुचाकीवरून दूध आणण्याकरिता रस्त्यावरून जात असताना दोघांनी त्यांना अडवून नाहक लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, हातातील चाकू दाखवून शिवीगाळ करीत खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांच्या दुचाकीच्या हेडलाइटच्या काचा फोडल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना चाकू दाखवून दोघे धमकावत होते. सदर प्रकार अर्धा तास सुरू होता. पोलिसांना माहिती मिळताच गोपनीय शाखेचे हवालदार पांडुरंग थोरात व सुभाष राऊत यांनी दोघांचा पाठलाग करून त्यांना दुचाकीसह हुतात्मा चौकात पकडले. या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांना अडविण्यासह दौंड पोलिस ठाण्यासमोरील एक विक्रेत्याला देखील धमकावले होते. मल्लिकार्जुन मुनमुटगी यांच्या फिर्यादीनुसार दोघा तरुणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
दौंड शहरात ६ डिसेंबर २०२१ रोजी किराणा मालाचे ठोक व्यापारी भक्तू सुखेजा यांच्याकडील १९ लाख ६४ हजार रुपयांची रोकड एका टोळीने लुटली होती व त्या टोळीचा प्रदीप ऊर्फ गणेश महेश कोळी हा सदस्य आहे. तो वर्षभर कारागृहात होता.
दरम्यान, रविवारी (ता. ७) पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्यासह पोलिस पथकाने दोघा संशयित आरोपींना पंचनामा व तपासकामासाठी बेड्या घालून घटनास्थळी नेले होते.