आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांना धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांना धमकी
आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांना धमकी

आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांना धमकी

sakal_logo
By

दौंड, ता. १६ : खासगी सावकारी करणाऱ्या आरोपींनी जिवंतपणी माझ्या नवऱ्याला व्याजासाठी मारले व त्यांच्या छळाला वैतागून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर हे सावकार गावभर फिरतात आणि आम्हाला छळत आहे, तरी पोलिस पकडत नाही. आम्हाला दुकानासमोर येऊन धमकी देतात. पोलिसांकडे तक्रार दिली तरी दौंड पोलिस काहीच कारवाई करीत नाही. मग आम्ही कोणाकडे दाद मागायची? असा उद्विग्न प्रश्न आत्महत्या केलेला तरुण व्यापारी विशाल दुमावत यांच्या पत्नी संगीता यांनी केला आहे.
दौंड शहरातील भांड्याचे व्यापारी विशाल शांतिलाल दुमावत (वय ३७, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, दौंड) याने कीटकनाशक घेतल्याने ४ फेब्रुवारी रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुकानासाठी खासगी सावकारांकडून मासिक १० ते ४० टक्के व्याजदराने पंचवीस लाख रुपये घेतले होते. मुद्दल व व्याजाची रक्कम दिल्यानंतरही संबंधित महिला सावकारांसह अन्य सावकार आणखी पैशांची मागणी करीत विशाल दुमावत याच्या गल्ल्यातून पैसे काढून घेत होते. पैसे न दिल्यास मारहाण करीत असल्याने त्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली.
संगीता दुमावत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रूपेश जाधव, नीलिमा गायकवाड, बाबू शेख, नाडी शेख, राजू सूर्यवंशी, मुन्नी काझी, टिल्लू काझी, निखिल पळसे व एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यापैकी निखिल पळसे व रवी सॅमसन गायकवाड यांना अटक केली. तर, मोहसीन ऊर्फ नाडी इक्बाल शेख व तालिब ऊर्फ बाबू रोहिन शेख यांना न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरता अंतरिम जामीन मंजूर झाला. तर, उर्वरित संशयित फरारी आहेत.
संगीता दुमावत यांनी मंगळवारी (ता. १६) पत्रकारांशी बोलताना अंतरिम जामिन मिळण्यापूर्वी संशयित आरोपी गावात फिरत होते, तरी पोलिसांनी त्यांना अटक न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. आरोपींना अटक न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना विचारले असता त्यांनी आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती दिली.

चित्रीकरण व चिठ्ठी
विशाल याने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईल संचात खासगी सावकारांचा नामोल्लेख करून त्यांच्याकडून झालेला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास व्हिडिओच्या माध्यमातून कथन केलेला आहे. मुद्दल व व्याजाची रक्कम रोख व ऑनलाइन पद्धतीने देण्यात आली. तसेच, मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. परंतु, प्रत्यक्षात दौंड पोलिसांनी संशयित आरोपींना अटक करण्याचे टाळले.