
दौंडमधील तपास अधिकारी बदलले
दौंड, ता. १७ : दौंड शहरात खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणारा तरुण व्यापारी विशाल दुमावत याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी बदलण्यात आले आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोन महिलांसह एकूण पाच संशयित आरोपी तीन महिन्यानंतरही दौंड शहरात राजरोस फिरत आहेत.
दौंड शहरातील भांड्याचे व्यापारी विशाल शांतिलाल दुमावत (वय ३७) याने कीटकनाशक घेतल्याने ४ फेब्रुवारी रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी (ता. १६) विशाल याची पत्नी संगीता दुमावत यांनी संशयित आरोपींना पोलिसांनी अटक न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. तसेच, आरोपींना अटक न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर दोन लहान मुलांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, विशाल दुमावत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. सदरचा तपास सहायक निरीक्षक अरविंद गटकुळ यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती दौंडचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
विशाल दुमावत याच्याकडून व्याज आणि मुद्दल वसूल करूनही एका खासगी सावकाराने त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीची दौंड पंचायत समितीसमोरील एक सदनिका लिहून घेत त्याची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद केली आहे. साडेतीन लाख रुपयांच्या कर्जापोटी वीस लाख रुपये मूल्य असलेली सदनिका सावकाराने एका महिला नातेवाईकाच्या नावे करून घेतली आहे. या सदनिकेबाबत पोलिसांना सांगून देखील कोणतीही कारवाई केली नाही.
फिर्यादी महिलेला धमकी
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी मोहसीन इकबाल शेख (रा. दौंड अर्बन बॅंकेमागे, दौंड) व तालिब रोहिन शेख (रा. खाटीक गल्ली, दौंड) यांनी २९ एप्रिल रोजी फिर्यादी संगीता दुमावत यांना अडविले. संगीता या मुलांच्या शाळेत जात असताना दोघांनी त्यांना अडवून, ‘पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घे, अन्यथा सोडणार नाही. आमच्या व्याजाचे पैसे दिले नाही तर तुला सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. संगीता यांनी याबाबत दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.