दौंडला बुधवारपासून दोन दिवस पाणी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडला बुधवारपासून दोन दिवस पाणी बंद
दौंडला बुधवारपासून दोन दिवस पाणी बंद

दौंडला बुधवारपासून दोन दिवस पाणी बंद

sakal_logo
By

दौंड, ता. २७ : दौंड शहरात जलवाहिनी दुरूस्तीच्या कामामुळे ३१ मे व १ जून रोजी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दौंडमधील जलवाहिनीची गळती थांबली नसून, नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. नगरपालिका साठवण तलाव ते जलशुद्धीकरण केंद्राच्या दरम्यान असणाऱ्या जलवाहिनींच्या दुरूस्ती काम प्रस्तावित असल्याने पाणीपुरवठा ३१ मे व १ जून रोजी बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरूस्ती असल्याने टॅंकरद्वारे देखील पाणीपुरवठा केला जाणार नाही. दुरूस्तीनंतर थेट २ जून रोजी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन नगरपालिकेने केले आहे, अशी माहिती दौंड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी डी. एस. क्षीरसागर यांनी दिली.
वाढता उष्मा, उन्हाळ्याच्या सुटीसाठी नातेवाईक आलेले असताना आणि लग्नसराईची रेलचेल असतानाच शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जलवाहिनी दुरूस्तीसंबंधी नागरिकांनी मागणी करून देखील नगरपालिका प्रशासनाने दुरूस्तीचे काम लांबणीवर टाकल्याने नागरिकांनी अपुरा पाणीपुरवठा होत आहे. शिवाय जो होतो तो दूषित आहे. पाणीपुरवठ्यासंबंधी निर्णय नगरपालिकेचे अधिकारी न घेता एक कंत्राटदार घेत असल्याने त्याच्या सोईने निर्णय घेतले जातात. परिणामी दूषित पाणी, गढूळ पाणी, कमी दाबाने, क्लोरिनचे अतिरिक्त प्रमाण असलेले पाणी दौंडकरांना मिळत आहे. शहरातील पाण्याची वितरण व्यवस्थांची लांबी ६८.८४ किलोमीटर लांबीची आहे, परंतु त्यास ठिकठिकाणी गळती असल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.
नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून विनानोंद पाण्याचे टॅंकर भरले जात आहेत. साठवण तलावाशेजारी व परिसरात नवीन विहिरी व आडवे बोअरवेल घेण्यास बंदी असतानाही काही लोकांनी बोअरवेल घेऊन पाण्याचा उपसा करून पाण्याचे टॅंकर भरण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. सदर पाणी कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसीमधील कंपन्यांना टॅंकरद्वारे विकले जात आहे.

पाणीचोरांवर कारवाई नाही
नगरपालिकेच्या नोंदीनुसार ८१८२ अधिकृत नळजोड आहेत, परंतु प्रत्यक्षात एक हजार नागरकांनी थेट मुख्य जलवाहिनीवरून चोरून नळजोड घेतलेले आहेत. नगरपालिका प्रशासनाला या चोरीची कल्पना आहे, परंतु भीतीपोटी प्रशासन कारवाई करीत नसल्याने वर्षानुवर्षे पाणीचोरी सुरू आहे. त्यााशिवाय मंजूर क्षमतेच्या नळजोडपेक्षा दुप्पट क्षमतेचा नळजोड घेणाऱ्यां नागरिकांची संख्या सुमारे पाचशे आहे. नगरपालिकेकडून पाणीचोरांवर कारवाई होत नसल्याने नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना मात्र अत्यंत कमी दाबाने दिवसाआड एक वेळ पाणीपुरवठा होत आहे.

गळती थांबविण्यास प्राधान्य
साठवण तलाव ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची गळती थांबविण्यासाठी नवीन जलवाहिनी प्रस्तावित आहे. गळती थांबविण्यास प्राधान्य आहे. पाणीचोरीसंबंधी माहिती दिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- डॅा. संतोष टेंगळे, मुख्याधिकारी, दौंड नगरपालिका

दौंड शहरातील पाणी पुरवठा स्थिती
- सप्टेंबर २०१५ पासून दिवसाआड फक्त एक वेळ पाणीपुरवठा.
- साठवण तलाव क्षमता ७५६ दशलक्ष लिटर (एमएलडी)
- सध्या दिवसाआड एकवेळ ७० लाख लिटर पाण्याचे वितरण
- वापरात नसलेला जुन्या साठवण तलावाची क्षमता ५६ दशलक्ष लिटर
- सध्या दरडोई १५० लिटर पाणी लिटर दिले जात आहे.