
आंबेगावात १६ टॅंकरने पाणी पुरवठा
घोडेगाव, ता. १४ : आंबेगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायत व लगतच्या वाड्यावस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी १६ टॅंकर पुरवण्यात आले असून, पंधरा विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. नव्याने नऊ ग्रामपंचायती टँकरची मागणी केली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
दुष्काळ परिस्थितीमुळे पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित ग्रामपंचायत व वाड्यावस्त्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पिण्यासाठी पाणी पंचायत समितीमार्फत देण्याची व्यवस्था केली आहे.
आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या बहुतेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये धामणी, मांदळेवाडी, पारगाव तर्फे खेड, कुरवंडी, वडगावपिर, कारेगाव, पहाडदरा, भावडी, गोहे बुद्रुक, जांभोरी, आसाणे, साकेरी, पिंपरी, लोणी, फलोदे, तळेघर, थुगाव या २९ हजार ६७ लोकसंख्या असलेल्या १२ ग्रामपंचायती व लगतच्या ८४ वाड्यावस्त्यांसाठी १६ टॅंकरने पाणीपुरवठा चालू केला आहे. त्यासाठी १ शासकीय व १५ खासगी टॅंकर आहेत. त्याचप्रमाणे १५ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.
पाण्याचे टॅंकर चालू करावे, यासाठी कुशिरे खुर्द व बुद्रुक, बोरघर, फुलवडे, तिरपाड, पेठ, उगलेवाडी, महाळुंगे पडवळची ठाकरवाडी, तांबडेमळा या ९ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत. संबंधित प्रस्तावांना मंजुरी मिळताच त्या ठिकाणी पाण्याचे टॅंकर चालू करण्यात येणार आहेत. तसेच, ज्या गावांना पाण्यासाठी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे, त्यांनीही आपले प्रस्ताव पंचायत समिती येथे लवकरात लवकर द्यावेत.
- जालिंदर पठारे, गटविकास अधिकारी, आंबेगाव
Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b00914 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..