वरसावणे गावास समस्यांचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरसावणे गावास समस्यांचा विळखा
वरसावणे गावास समस्यांचा विळखा

वरसावणे गावास समस्यांचा विळखा

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २४ : दुर्गम वरसावणे (ता. आंबेगाव) गावास अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. पदाधिकारी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वांनाच नाहक त्रासाला समोरे जावे लागत आहे. संबंधितांनी शाळा, रस्ता, पाणी आदी सामाजिक प्रश्‍न त्वरित न सोडविल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

मागील वीस वर्षांपासून चार किलोमीटर रस्त्याचे ना डांबरीकरण झाले ना तो दुरुस्त झाला. येथील जिल्हा परिषदेचे शाळा बांधकाम पूर्ण नसल्याने विद्यार्थ्यांना अंगणवाडीच्या शाळेत बसावे लागते. अजूनही येथे महिलांना विहिरीवरून पिण्याचे पाणी आणावे लागते. अशा विविध समस्यांना कंटाळून मतदान करणार नाही, असा इशारा येथील ग्रामस्थांनी ''सकाळ''शी बोलताना दिला. महसुली गाव आंबेगाव तालुक्यात परंतु पोलिस ठाणेसाठी जुन्नर तालुक्यात जावे लागते. विविध समस्या सोडविण्याकडे सरपंच, ग्रामसेवक दुर्लक्ष करतात, असे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, सरपंच सीताबाई बांबळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आश्वासन देवून पदाधिकारी ही बोळवण
वरसावणे हे ३० घर व १५० लोकसंख्या असलेले गाव डिंभेपासून २५ किलोमीटर अंतरावर हे आंबेगाव व जुन्नरच्या सीमेवर वसलेले गाव आहे. वरसावणे फाट्यापासून ४ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण अद्यापपर्यंत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रखडले आहे. आश्वासन देवून पदाधिकारी ही बोळवण करतात असा आरोप येथील ग्रामस्थ कांताराम भांगे, गणपत भांगे, नवनाथ भांगे यांनी केला आहे. रस्ता चांगला नसल्याने एसटीसाठी विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठांना बोरघरला १२ किलोमीटर पायी जावे लागते.

शाळेची इमारत व शौचालयाची मागणी
जिल्हा परिषद शाळेसाठी वर्ग बांधण्यासाठी २०१९-२० मध्ये निधी जिल्हा नियोजनातून माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंजूर केला होता. त्यातील सहा लाख रुपयांचा निधी मिळाला. परंतु या इमारतीचे प्लास्टर, फरशी, लाइट, खिडक्या ही कामे अपूर्ण असल्याने येथील मुलांना अंगणवाडीच्या शाळेत बसावे लागते. दोन महिला शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी वापरात असलेले शौचालय कोसळल्यामुळे त्यांच्याबरोबर विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. ही इमारत तातडीने पूर्ण करावी व शौचालय बांधावे, अशी मागणी पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना करूनही कार्यवाही झाली नसल्याचे संगीता भांगे यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपातील विविध समस्या...
१. महसुलीच्या कामासाठी डिंभे येथे जावे लागते.
२. पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफिस जुन्नर येथे आहे.
३. शासकीय कर्मचारी फिरकत नसल्याने समस्या कायम
४. पावसाळ्यात लाइटसाठी पाहावी लागते वाट
५. पेसाचा निधी अद्याप खर्च झालेला नाही

दीड किलोमीटर वरील विहिरीतून पाणी अजूनही महिलांना आणावे लागते, असे सुवर्णा भांगे व सखूबाई भांगे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेकडून मंजूर झालेली ३ गाय गोठा प्रकरणाचे पैसे एक वर्ष होवूनही लाभार्थ्यांना मिळाले नाहीत. घरकुलासाठी ५ ते ६ नावे मंजूर होती. परंतु चुकीच्या सर्व्हेमुळे हे लाभार्थी अजूनही वंचित असल्याचे लाभार्थी दगडू भांगे, गोविंद भांगे, बाळू भांगे, धोंडू भांगे यांनी सांगितले.

शाळेचे अपूर्ण इमारतीसाठी व शौचालयासाठी पंचायत समिती शेष फंडातून निधी देवून लवकरच काम पूर्ण केले जाईल. रस्त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविला जाईल. नवीन नळ पाणीपुरवठा योजना लवकरच मंजूर होईल. इतर समस्यांबाबत चौकशी करून कार्यवाही केली जाईल.
- जालिंदर पठारे, गटविकास अधिकारी

.............................................................................................................................................................................................
01698, 01697

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b01027 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..