
गोणवडी औद्योगिक संस्थेत प्रशिक्षणार्थीना पदवी प्रदान
घोडेगाव, ता. २७ ः जागतिक स्तरावर देशाची औद्योगिक भरभराट व्हावी, तसेच प्रशिक्षण संस्थांचे महत्त्व वाढावे यासाठी यावर्षापासून पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम गोणवडी (ता. आंबेगाव) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यात आला. भगवान विश्वकर्मा हे कौशल्य आणि हस्तकलेशी निगडित असल्याने विश्वकर्मा दिनालाच हा दीक्षांत समारंभ घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे, माजी प्राचार्य एस. एम. मंडलिक उपस्थित होते.
संस्थेतील विविध व्यवसायांमध्ये ऑगस्ट २०२२ परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावून यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कौशल्य पदवी प्रमाणपत्रेही यावेळी प्रदान करण्यात आली.
या संस्थेत एकूण १५० प्रशिक्षणार्थ्यांपैकी १२२ प्रशिक्षणार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले. यावर्षी संस्थेचा निकाल ९४ टक्के इतका लागला आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमन या ३ व्यवसायाचा निकाल शंभर टक्के लागला.
प्राचार्य अशोक साबळे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पुढील शिक्षणासंबंधी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती जव्हेरी यांनी केले. नियोजन रूपाली घोडेकर, तर आभार एस. टी. हगवणे यांनी मानले.
.,.....................................