घोडेगाव परिसरात डेंग्यूसदृश्य लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडेगाव परिसरात डेंग्यूसदृश्य लागण
घोडेगाव परिसरात डेंग्यूसदृश्य लागण

घोडेगाव परिसरात डेंग्यूसदृश्य लागण

sakal_logo
By

घोडेगाव, ता. १४ : घोडेगाव, काळेवाडी-दरेकरवाडी ग्रामपंचायत परिसरात थंडी - तापाच्या साथीने थैमान घातले आहे. बहुतांश रुग्णांना डेंग्यूसदृश्य साथीची लागण झाल्याचे समोर येत आहे. दोन महिन्यात २२ रुग्णांना डेंगू सदृश्य रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाने अकरा पथके स्थापन केली आहेत.
दिवसेंदिवस या रुग्णांमध्ये वाढ होत असून त्यासाठीच्या उपाययोजना राबविण्याकडे आरोग्य विभाग लक्ष देत आहे. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होत आहे.
आंबेगाव तालुका आरोग्य विभागाकडे घोडेगाव परिसरात डेंग्यूसदृश्य साथीचे ऑक्टोबर महिन्यात १२ रूग्ण असल्याची व १० नोव्हेंबरपर्यंत १० रूग्ण असल्याची नोंद आहे. हा आकडा अधिक असल्याची शक्यता आहे.
ग्रामीण रूग्णालय घोडेगाव येथे डेंग्यूसदृश्य रुग्णांवर चांगले उपचार व्हावे, यासाठी येथील डॉक्टर, आरोग्य सेवक लक्ष देत आहेत.
पंचायत समिती तालुका आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र लांडेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घोडेगाव, काळेवाडी-दरेकरवाडी येथे घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करत आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायतीमार्फत धुळफवारणी केली असून एक दिवस कोरडा पाळला जात आहे.

‘लक्षणे जाणविल्यास त्वरित उपचार करा’
अचानक वाढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्या मागे दुखणे, भूक मंदावणे, मळमळणे, पोटदुखी आदि काही लक्षणे जाणवल्यास अंगावर न काढता नागरिकांनी ग्रामीण रूग्णालय घोडेगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे येऊन उपचार करावेत, असे आवाहन घोडेगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नंदकुमार वणवे, लांडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस टी तारडे, डॉ. संदीप जाधव यांनी केले.