
घोडेगावात खातेदारांची १६ लाखांची फसवणूक
घोडेगाव, ता. १ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तिरूमला तिरूपती मल्टीस्टेट को. ऑफ सोसायटीमधील बॅंक खातेदारांची १६ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी भीमाशंकर इकळके याच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत घोडेगाव पोलिसांनी माहिती दिली की, याबाबतची तक्रार अक्षय रोहीदास सैद (पतपेढी मॅनेजर) यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. भिमाशंकर शिवा इकळके (सध्या रा. विश्वासराव मळा, लांडेवाडी, ता. आंबेगाव; मुळ रा. माल्याल, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) यास सोसायटीकडून लोकांची खाते सुरू करणे, तसेच त्यांची ठेवी गोळा करण्यासाठी जानेवारी २०१९ पासून सल्लागार म्हणून नेमले आहे. तसेच, खातेदारांची दैनंदिन रक्कम गोळा करण्यासाठी कलेक्शन एजंट नेमलेले आहेत.
दरम्यान, संबंधित कलेक्शन खात्यावरील आपली रक्कम काढण्यासाठी खातेदार सोसायटीमध्ये आले असता त्यांच्या खात्यांवर संबंधित रक्कम दिसून आली नाही. त्यावेळी कलेक्शन एजंटकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, इकळके यांच्याकडे पैसे जमा केले आहेत. त्यावेळी क्रेडीट सोसायटीमधील रक्कमेचा सन २०२२ ते १२ मे २०२३ चे दरम्यान ताळेबंद केला असता ९० खातेदारांच्या पासबुकमध्ये १६ लाख १२ हजार रुपयांची तफावत दिसली. त्यावेळी इकळके याच्याकडे चौकशी केली असता त्याने तिरूमल्ला तिरूपती मल्टीस्टेट को. ऑफ क्रेडीट सोसायटीचे बनावट पासबुक व शिक्के बनवून ते खरे असल्याचे भासवून कलेक्शन एजंट यांच्याकडून पैसे घेतले. मात्र, सोसायटीमधील खात्यामध्ये न भरता स्वतःकडे ठेवल्याचे सांगितले.
याबाबत सहायक पोलिस शिक्षक जीवन माने म्हणाले, ‘‘तिरूमला तिरूपती मल्टीस्टेट को. ऑफ. सोसायटी घोडेगाव शाखेत कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी न घाबरता घोडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी.’’