हर हर महादेवच्या गजरात काटेमोडवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर हर महादेवच्या गजरात काटेमोडवन
हर हर महादेवच्या गजरात काटेमोडवन

हर हर महादेवच्या गजरात काटेमोडवन

sakal_logo
By

गुळुंचे, ता. ५ ः गुळुंचे (ता. पुरंदर) येथील प्रसिद्ध व भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेली काटेबारस यात्रा यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडली. हर हर महादेवच्या गजरात काटेमोडवन पार पडले. तर मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
आज दुपारी बारा दिवसांच्या उपवासाची तसेच छबिना, भजन, कीर्तन, अभिषेक आदी धार्मिक विधींची सांगता काटेमोडवनाने झाली. गतवर्षी अमरावती, नांदेड, मालेगाव येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जमावबंदीचा आदेश (१४४ कलम) लागू करण्यात आला होता. त्यामुळे यात्रा साध्या पद्धतीने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. यंदा मात्र, निर्बंध हटविल्याने जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील हजारो भाविकांनी काटेमोडवन पाहायला हजेरी लावली. यात्रेच्या पूर्वसंध्येला श्री ज्योतिर्लिंग व ज्योतिबाच्या उत्सव मूर्तींची ग्रामप्रदक्षिणा वाजतगाजत काढण्यात आली. कीर्तन झाल्यावर छबिना खेळत उत्सवमूर्तींना मंदिराच्या बाहेर आणण्यात आले. छबिन्याचे विविध डाव खेळत शिवआराधना करण्यात आली. पालखी मार्गावरून वाजतगाजत नेण्यात आली. ठिकठिकाणी उत्सवमूर्तींच्या स्वागतासाठी भाविक व तरुणांनी रांगोळ्या काढल्या होत्या. तर रस्त्यावर फुलांची आरास करण्यात आली होती. जुन्या पद्धतीने डाव धरत उत्सवमूर्तींना मानवंदना देण्यात आली. ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली. पहाटे अजित मांडके व गुरव प्रशांत शिंदे यांनी उत्सवमूर्तींना अभिषेक घातला. पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी दंडवत घेतले. छबिना, आरती, काठीची प्रदक्षिणा झाल्यावर काटेमोडवन पार पडले. यावेळी ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन, यात्रा समिती, स्वयंसेवकांनी काम पाहिले. नीरा दुरक्षेत्र व जेजुरी पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप व त्यांचे सहकारी गणेश जगताप यांनी आज यात्रेला हजेरी लावली. तत्पूर्वी सहकार महर्षी कै. चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी उत्तम निगडे, नितीन निगडे, विलास निगडे, गोरख निगडे आदी उपस्थित होते. आगामी काळात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी आश्वासन दिले.