राख सोसायटीकडे मागितला लेखी खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राख सोसायटीकडे मागितला लेखी खुलासा
राख सोसायटीकडे मागितला लेखी खुलासा

राख सोसायटीकडे मागितला लेखी खुलासा

sakal_logo
By

गुळुंचे, ता. ५ : राख (ता. पुरंदर) येथील राख विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कथित गैरव्यवहाराच्या तपासणीत संस्थेच्या कामकाजात दोष दिसून आले आहेत. याबाबत संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष महेंद्र माने यांच्यासह इतर संचालकांना लेखापरीक्षक एस. एस. कुलकर्णी यांनी नोटीस बजावली असून, पंधरा दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले.
राख येथील सोसायटीत महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यातून रोख रक्कम काढून आर्थिक अपहार केल्याची तक्रार सोसायटीच्या काही सभासदांनी सहायक निबंधकांकडे केली होती. त्यानंतर तक्रार अर्जात तथ्य नसल्याचे निबंधकांनी कळविले होते. मात्र, त्यानंतर सभासदांनी नीरा (ता. पुरंदर) येथे धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त केला होता. जिल्हा उपनिबंधकांना सभासदांनी पुन्हा चौकशी करण्याचे निवेदन दिल्यावर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना राबवीत असताना ४ लाख ४३ हजार १७४ रुपयाची फसवणूक केल्याचे अहवालात म्हटले असून, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यातून रोख रक्कम काढून ५ लाख ७६ हजार ९०२ रुपयांची फसवणूक केल्याचे अहवालात लेखापरीक्षक कुलकर्णी यांनी नमूद केले. अहवालात सादिल खर्च, शताब्दी महोत्सव, वेतन खर्च, जाहिरात खर्च, सचिवांनी काढलेली अनामत रक्कम यांबाबत संस्थेच्या दप्तरी नोंद नसल्याचे तसेच जादा रक्कम काढल्याचे परीक्षणात दिसून आलेले आहे. तसेच सानुग्रह अनुदान मंजूर रकमेपेक्षा जादा खर्च केल्याचे म्हटले आहे. काही ठिकाणी बोगस खर्च टाकून अपहार केल्याचा ठपका संस्थेवर ठेवण्यात आला आहे.
याबाबत शेतकरी सभासद सूर्यकांत रणनवरे म्हणाले, ‘‘गैरव्यवहार बाहेर काढण्यासाठी दीड वर्षे लढा दिला असून, ज्यांनी लाखो रुपये लुटले व संस्थेच्या पैशांवर डल्ला मारला आहे, अशांवर कडक कारवाई झाली पाहिजे.

आर्थिक फायद्यासाठी हे प्रकरण सुरू आहे. याविषयी तलाठ्यांनी त्यांचे म्हणणे सादर केलेले आहे. आम्हीही वकिलांमार्फत म्हणणे सादर केले आहे. संस्थेचा कारभार पारदर्शक आहे. पुढील निर्णय प्रशासकीय पातळीवरून होईल.
- महेंद्र माने, माजी चेअरमन, राख सोसायटी