मतदार नोंदणी ऑनलाइन; तपासणी ऑफलाइन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार नोंदणी ऑनलाइन; तपासणी ऑफलाइन
मतदार नोंदणी ऑनलाइन; तपासणी ऑफलाइन

मतदार नोंदणी ऑनलाइन; तपासणी ऑफलाइन

sakal_logo
By

गुळुंचे, ता. १५ : गुळुंचे (ता. पुरंदर) येथील मतदारयादीत गेल्या काही महिन्यात ऑनलाइन नावे नोंद करणाऱ्या तसेच १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या जवळपास ४० जणांना निवडणूक विभागाने नोटीस बजावल्या आहेत. त्यातील अनेक नवीन मतदारांनी आपले पुरावे नुकतेच सादर केले असून, आगामी मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नोंदणी ऑनलाइन; तर पुराव्यांची तपासणी ऑफलाइन, असा अजब प्रशासकीय कारभार येथे पाहायला मिळाला आहे.

सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गावकामगार तलाठी गणेश महाजन व ग्रामसेवक जयेंद्र सुळ यांनी रहिवासी पुरावे सादर करण्याच्या ऑफलाइन नोटीस बजावल्या आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यात ज्या नवीन मतदारांनी गावात ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी अर्ज केले आहेत, त्यांची पडताळणी सुरू आहे. मात्र, यापूर्वी अशी पडताळणी गावात कधीही झाली नाही.
ऑनलाइन प्रक्रियेत मतदार आपली नोंदणी करतात व स्वतःची माहिती ऑनलाइन नोंदवतात. त्यानंतर रहिवासी पुरावा, आधारकार्ड, जन्मतारखेचा पुरावा, नातेवाइकाचे आधारकार्ड आदी तपशील भरल्यावर आवश्यक कागदपत्रे व्होटर पोर्टलवर अपलोड करावी लागतात. त्यानंतर या सर्व दस्तऐवजांची पाहणी करून निवडणूक विभागाकडून ऑनलाइन अर्ज मंजूर करण्यात येतो किंवा दस्तऐवज अपूर्ण किंवा चुकीचे असल्यास ऑनलाइन अर्ज नामंजूर केला जातो, अशी सर्वसाधारण प्रक्रिया असते. मात्र, ऑनलाइन अर्जाची ऑफलाइन सुनावणी सहसा कुठेही घेतली जात नाही.
गुळुंचे गावाची निवडणूक कार्यक्रम आगामी टप्प्यात सुरू होणार आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांचे मतदार याद्यांवर लक्ष असून, बारकाईने याद्या पाहिल्या जात आहेत. तत्पूर्वी ग्रामस्थ नितीन निगडे व अक्षय निगडे यांनी गावात दुबार व बोगस मतदार असल्याची तक्रार प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे करत नमुना ७ चे अर्ज भरून दोन ठिकाणी मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांवर आक्षेप घेतले होते. त्यानंतर चौकशी होऊन ३३ मतदारांची नावे कमी करण्यात आली होती. मात्र, या सबंध प्रक्रियेत रीतसर पंचनामे केले नसल्याची तक्रार संतोष निगडे व इतरांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली. यावरील सुनावणीत प्रातांनी तलाठी गणेश महाजन यांनी विभागीय चौकशी प्रस्तावित करत पुन्हा मतदारांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशी प्रक्रियेत मतदारांची चौकशी होण्याआधीच वगळलेल्या काही मतदारांची नावे मतदार यादीत आली. त्यामुळे व्यथित होऊन नितीन निगडे यांनी प्रांत कार्यालयापुढे दोन दिवस उपोषण केले होते. आमदार संजय जगताप यांनी या प्रक्रियेत लक्ष घालून नियमाप्रमाणे काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. दुबार मतदारांवर गुन्हे नोंद करण्याचे आश्वासन मिळाल्यावर निगडे यांनी उपोषण मागे घेतले होते.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या चुका पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासन नवीन मतदारांना नोटीस देऊन पुरावे घेत असले; तरी यामुळे नवीन मतदारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रथम ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी वेळ जात असून, नंतर पुन्हा ऑफलाइन पुरावे द्यावे लागत असल्याने मतदारांना एकाच कामासाठी तीच कागदपत्रे घेऊन तलाठी कार्यालय गाठावे लागत आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदणीचा फार्स कशासाठी? असा प्रश्न आता लोक विचारत आहेत.

आम्ही दुबार मतदारांवर आक्षेप घेतले आणि प्रशासनाने नवीन मतदार नोंदणी करणाऱ्यांना नोटीस दिल्या. लोकांनी कामधंदा बघायचा की कागदपत्रे घेऊन कार्यालये फिरायची, हेच समजत नाही. निवडणूक विभागाचे काम गचाळ सुरू असून, तत्पर अधिकाऱ्याकडे या विभागाचा कारभार सोपवला जावा.
- नितीन निगडे

वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या पत्रावरून नवीन नोंदणी केलेल्या सर्व मतदारांना कागदपत्रे तपासण्याच्या नोटीस दिल्या आहेत. आम्ही नेमून दिलेले काम करत आहोत.
- गणेश महाजन, तलाठी, गुळुंचे