
नीरेत १०२ विद्यार्थी सहभागी
गुळुंचे, ता. २२ : येथील सौ. लीलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयात ‘सकाळ’तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत १०२ विद्यार्थी सहभागी झाले होते. पहिली ते दहावीपर्यंतच्या चार वेगवेगळ्या वयोगटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नीरा, निंबूत, पाडेगाव, जेऊर येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.
बोचरी गुलाबी थंडी आणि सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेत नीरा (ता. पुरंदर) येथे सकाळच्या बालचित्रकला स्पर्धेला सुरुवात झाली. पेन्सिलने उभ्या, आडव्या रेषा, सुंदर चित्रे रेखाटत बालचमू या स्पर्धेत आनंदाने सहभागी झाले. भोवती ठेवलेल्या वेगवेगळ्या रंगांच्या बाटल्या, ट्यूब कलर, खडू, रंगीत पेन्सिल, ब्रश यांनी चित्रात रंग भरताना बालचमू दंग झालेले दिसत होते. कोणी मास्क रेखाटत होते तर कोणी क्रिकेटच्या सामन्यातील गोलंदाज आणि फलंदाज रेखाटण्यात व्यग्र होते. वेगवेगळ्या आकारांचे मासे काढत काही बालगोपाळांनी फिशटॅंक काढला तर काहींनी केक काढत त्यात रंग भरले. स्पर्धेसाठी अश्विनी खोपे, एस. डी. मदने, एस. बी. पाटोळे, गुलाब बुधे यांनी सहकार्य केले.