
नीरा येथील पालखीतळाची पाहणी
गुळुंचे, ता. २५ ः श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीतून विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असून पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शेवटचे विसाव्याचे ठिकाण असलेल्या नीरा (ता. पुरंदर) येथील पालखीतळाची पाहणी करण्यात आली.
यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे-पाटील यांनी पिसुर्टी ते नीरे पर्यंतच्या साइड पट्ट्यांचे व रस्त्यांचे डांबरीकरण तसेच नीरा नदीवरील जुन्या पुलाला संरक्षक कठडे बसविणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच पालखी सोहळ्यात मुक्कामाच्या व विसाव्याच्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ नये, याकरिता सोहळ्यापूर्वी पालखी तळांची व पालखी महामार्गाची पाहणी करीत असल्याचे सांगितले.
यावेळी पुरंदर- दौंडचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता स्वाती दहिवाल, वाल्ह्याचे मंडलाधिकारी भारत भिसे, नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, अनंता शिंदे आदी उपस्थित होते.