काटेमोडवनात ३०० हून अधिक भाविकांचा सहभाग
गुळुंचे, ता. २ : गुळुंचे (ता. पुरंदर) येथील प्रसिद्ध आणि जागृत ज्योतिर्लिंग मंदिरात दुपारी एकनंतर काटेमोडवनाला सुरुवात झाली. दरवर्षी काटेमोडवनात सहभागी भाविकांची संख्या वाढत आहे. यंदा या संख्येत वाढ होऊन सुमारे ३०० हून अधिक भक्तांनी काटेमोडवन केल्याचे उपस्थितांनी सांगितले. विशेष म्हणजे काटेमोडवनात किशोरवयीन, तरुणांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे आजतागायत सुरू असलेल्या लोकभ्रमाला फाटा देत काटेमोडवनाचे वैज्ञानिक स्वरूप सर्वच वयोगटातील भाविकांच्या लक्षात आणून देणे काळाची गरज बनले आहे.
येथील शिवशंकराचे मंदिर हेमाडपंथीय असून ते पुरातन आहे. शिवलिंग स्वयंभू असल्याचे पुजारी सांगतात. काटेमोडवनाबाबत जाणकार नागरिक सांगतात, ‘‘हा खेळ साहसी खेळ असून त्याद्वारे या गावाने वेगळेपण टिकविले आहे. राजेरजवाड्यांच्या कालखंडात हा प्रकार शौर्य प्रदर्शित करणारा साहसी खेळ म्हणून उदयाला आला असावा. आजही राज्यातील अनेक गावात असे खेळ, छबिना व वैविध्यपूर्ण कला, नृत्याविष्कार पाहायला मिळतात. या कला परंपरेने पुढे चालत येऊन नंतर यात्रा, सणांचा अविभाज्य भाग बनतात. राजेरजवाडे कालखंडात मनोरंजनासाठी हा प्रकार सुरू झाला असावा. काटेमोडवनात सहभागी मजूर, कष्टकरी यांना बक्षीस मिळत असावे किंवा त्यांची भरती सैन्यात होत असावी. हाच साहसी खेळ पुढे मुख्य यात्रेचे आकर्षण बनला असावा.’’
काटेबारस यात्रेत काटेमोडवन करण्याची सुरुवात पाटोळे मानकरी करतात तर शेवट गोरगल, भंडलकर करतात असे मानकरी काळूराम पाटोळे यांनी सांगितले. समाजातील उपेक्षित, बहिष्कृत व मागासवर्गीय समाजातील लोक या यात्रेचे मानकरी असल्याचे दिसून येते. त्यामुळे साहसी खेळाद्वारे या लोकांनी जागृत ठेवलेली शौर्यपरंपरा तसेच शेकडो वर्षांपूर्वीपासून जातीयवादाला थारा न देणारे गाव म्हणून या यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व असून याबाबत अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.
गावाच्या यात्रेत अगदी पूर्वीपासून सर्व जातींचे, धर्माचे लोक समाविष्ट होतात. गुळुंचे हे गवळ्यांचे गाव म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे समतेचा पुरोगामी विचार परंपरा शेकडो वर्षांपासून जपणारे हे गाव आहे. ज्योतिर्लिंग मंदिरात कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीला कधीही मज्जाव केल्याचे पूर्वजांपासून ऐकिवात नाही.
- पोपट निगडे, पंच यात्रा समिती, गुळुंचे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

